शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ):-राज्यातील सर्व दूध उत्पादकांचे आर्थिक हित लक्षात घेवून सहकारी दुध उत्पादक संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरीता दुध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राज्यात दुध उत्पादक शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सर्व आमदार आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेवून ५ रुपये अनुदानाचा निर्णय जाहीर केला. सदरची अनुदान योजना ही राज्यातील फक्त सहकारी दुध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असून, याकरीता सहकारी दुध संघांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ करीता प्रतिलिटर किमान २९ रुपये दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रतिलिटर ५ रुपये अनुदान बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
सदर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक करणे व पडताळणी करणे आवश्यक असल्याचे सांगून सदर अनुदानाची योजना दिनांक १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी लागू करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार आढावा घेवून या योजनेला मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, सदर योजना दुग्धविकास आयुक्तांच्या मार्फत राबविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असल्याचे विखे पाटील म्हणाले.
दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारातील दुध भूकटी व बटरचे दर यांच्या दरावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दुध भूकटी व बटरचे दर कमी झाल्यामुळे दुधाचे दर कमी होत असल्याकडे लक्ष वेधून दुधाच्या पुष्ठ काळातही दुधाचे दर कोसळतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी राज्यसरकारने उचित हस्तक्षेप करुन दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे विखे पाटील म्हणाले. यापूर्वी सुद्धा राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरिक्त दुध स्विकारुन त्याचे दुधभुकटी व बटरमध्ये रुपांतर करुन अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता.