आश्वी( जनता आवाज वृत्तसेवा ):-राज्यातील महायुती सरकारने शेतक-यांसाठी संवेदनशिलपणे निर्णय घेतले आहेत. नैसर्गिक संकटात झालेल्या नुकसानीपोटी शेतक-यांना राज्य सरकारने विविध योजनांमधून बारा हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. येणा-या काळात महायुती सरकार शेतक-यांच्या कर्जमाफीचाही निर्णय करणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
नांदुर, रांजणखोल आणि ममदापूर या ठिकाणी महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सभेमध्ये मतदारांशी संवाद साधून महायुतीने घेतलेल्या निर्णयांची माहीती दिली. यापुर्वी सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारने राज्याला वा-यावर सोडून दिले होते. महायुती योजना सुरु केल्यानंतर आघाडीच्या नेत्यांना आता जाग आली आहे. पण तुमच्या योजनांची आश्वासनं ही खोटी असल्याचा थेट आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केला.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना यांना राज्यातील शेतक-यांची आठवण राहीली नाही. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतक-यांच्या हिताचे निर्णय झाले. मागेल त्याला शेततळे, पॉलिहाऊस, शेडनेट अशा पध्दतीच्या योजना सुरु केल्या. शेतक-यांच्या खात्यात थेट अनुदान जमा झाल्याने या योजनेचा मोठा दिलासा राज्यातील शेतक-यांना मिळाला असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, एक रुपयात पीक विमा योजना सुरु करुन, राज्यातील शेतक-यांना स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला आहे. आज विमा रकमेचे अनुदान मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या खात्यात जमा झाले आहे.
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतक-यांना हेक्टरी ५ हजार रुपयांचे अनुदान दिले. यापुर्वी अशा पध्दतीची योजना कोणीही सुरु केली नव्हती. आता वीजेची समस्या सोडविण्यासाठी सौर उर्जेचे धोरण शेतक-यांसाठी महायुती सरकार राबवित असून, शेतक-यांना दिवसाही वीज देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हे सरकार देणारे सरकार असल्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर शेतक-यांसाठी कर्जमाफीच्या योजनेची अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.
आघाडीने राज्य समोर पंचसुत्री ठेवली आहे. पण आघाडीच्या नेत्यांमध्ये सुसूत्रता नाही. त्यामुळे त्यांच्या पंचसुत्रीवर जनतेचा विश्वास नाही. ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे तिथे अशा योजना सुरु करुन त्या योजना बंद केल्या आहेत. त्यामुळे आमच्या लाडक्या बहीणी महाविकास आघाडीच्या कोणत्याही योजनेवर विश्वास ठेवणार नाहीत. आम्ही योजना सुरु करुन, चार हप्ते खात्यात वर्ग केल्यामुळे महायुतीच्या योजनेची खात्री बहीणींना आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत सर्व बहीणी महायुती मधील भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे नेते केवळ बोलण्यापुरते तुमच्याकडे येत आहेत. कोणताही विकासाचा अजेंडा त्यांच्याकडे नाही. व्यक्तिगत टिका आणि नालस्ती या पलिकडे विकासाच्या कोणत्याही मुद्यावर ते बोलायला तयार नाहीत. बाहेरची माणसं येवून आपल्या विकास प्रक्रीयेला गालबोट लावण्याचा करीत असलेला प्रयत्न हाणून पाडा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.