राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):-गणेश कारखाना सभासंदाच्या मालकीचा राहावा, या हेतूनेच चालवायला घेतला होता. आम्ही कारखाना सुरु केला म्हणूनच आज तो तुमच्या ताब्यात मिळाला आहे. आम्ही पुढाकार घेतला नसता तर, शेतक-यांच्या मालकीचा हा कारखाना खासगी माणसाच्या ताब्यात गेला असता. कारखान्याच्या प्रश्नाचेच भांडवल करुन, राजकारण करु पाहणारे विकासाच्या मुद्यावर बोलत का नाहीत असा सवाल महायुतीचे उमदेवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.
महायुतीच्या प्रचारार्थ एकरुखे, राजंणगाव खुर्द या गावांमध्ये आयोजित केलेल्या ग्रामस्थ आणि पदाधिका-यांच्या बैठकीत ना.विखे पाटील बोलत होते. या दोन्हीही गावांमध्ये ना.विखे पाटील यांच्या समर्थनार्थ मोटारसायकल रॅली काढली. यामध्ये महिला आणि युवक उत्फुर्तपणे सहभागी झाले होते. महायुती सरकारच्या मागील अडीच वर्षात घेतलेल्या या निर्णयांना या निवडणूकीत आपण मतदानाच्या रुपाने पाठबळ द्यावे, भविष्यात सरकार सत्तेवर येताच अधिकच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास सरकार कटीध्द राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, शेजारचे नेते आपल्या भागात येवून संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. यापुर्वी तेही मंत्री होती पण याभागाकरीता दमडीचाही निधी ते देवू शकले नाहीत. पालकमंत्री म्हणून संगमनेर तालुक्या करीता आपण राजकारण आड येवू न देता निधीची उपलब्धता करुन दिली. आज केवळ भावनीक मुद्दे उपस्थित करणारे संगमनेरचे नेते स्वत:च्या चुका झाकुन ठेवत आहेत.
पाटबंधारे मंत्री असताना समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत त्यांनी जिल्ह्याच्या मानगुटीवर बसविले. हा कायदा करताना भविष्यात होणा-या नुकसानीचे थोडेही काही वाटले नाही. आज जिल्ह्याच्या हक्काचे पाणी गेले, त्याचा शेतीक्षेत्राला मोठा फटका बसला. मात्र यावर आज ते बोलायला तयार नाहीत, याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की, केवळ दहशतीचा मुद्दा हेच त्यांच्या प्रचाराचे भांडवल आहे. पण विकासाच्या मुद्यावर ते काहीचच बोलायला तयार नाहीत. लोक प्रश्न विचारतील म्हणून प्रचाराची दिशा दुसरीकडे घेवून जाण्या केवीलवाना प्रयत्न महाविकास आघीडीच्या नेत्यावर आला आहे.
मागील अडीच वर्षात महायुती सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांचा लाभ शिर्डी मतदार संघातील प्रत्येक माणसाला झाला आहे. एक रुपयात पीक विमा योजनेपासून ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यापुर्वी कधीही झाला नाही असा वीज बिल माफीचा निर्णय महायुती सरकारने घेवून शेतक-यांना दिलासा दिला आहे. साडेसात अश्वशक्तीच्या पंपाना वीज बिल माफ करुन झीरो रकमेचे बिल सरकारने दिले आहे. भविष्यात शेतक-यांच्या कर्जमाफीया निर्णयही महायुती सरकारच घेईल असे त्यांनी आश्वासित केले.
आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जाहीरनामे प्रसिध्द होत आहेत. पण त्यांच्यावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. महिलांना तीन हजार रुपये देण्याची घोषणा ते करीत आहेत. पण आमच्या सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कोर्टात जावून विरोध करणारे आता पैसे कुठून आणणार असा प्रश्नही ना.विखे पाटील यांनी उपस्थित केला.
शिर्डी येथे उभारण्यात येणारी औद्योगिक वसाहत ही या भागातील युवकांच्या रोजगारासाठी महत्वपूर्ण ठरणार असून, या भागात अधिकचे उद्योग येण्यासाठी आपले प्रयत्न सुरु झाले आहेत. या भागातील तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगार देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.