राहाता,( जनता आवाज वृत्तसेवा ):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जगातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी राज्यात महायुतीचे सरकार येणे गरजेचे असून, यासाठी जनतेनेची साथ आम्हाला निश्चित मिळेल असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे.पी नड्डा यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या प्रगती बरोबरच शिर्डी नगरीच्या विकासाला पुढे घेवून जाण्यासाठी महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठबळ देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत मंत्री जे.पी नड्डा यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहीती देवून भविष्यात राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे अनुदान २१०० रुपये आणि ५ लाख लखपती दिदि निर्माण करण्याचे अभिवचन दिले. राज्यात यापुर्वी योजनांना ब्रेक लावणारे सरकार होते. महायुती सरकार मात्र गतीने पुढे जाणारे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या मंत्राने ही विकास प्रक्रीया अधिक गतीने पुढे घेवून जाण्यासाठी राज्यात महायुती सरकारचीच गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
राज्यातील जनतेमध्ये महायुती सरकारला निवडून देण्याचा मोठा उत्साह असुन, या सरकारने लोकांच्या हितासाठी निर्णय केले आहेत. यापुर्वी महाविकास आघाडीकडून फक्त भ्रष्टाचार झाला, जातीपातीचे राजकारण झाले. परंतू याला महायुती सरकारने मात्र सर्व समाज घटकांना बरोबर घेवून विकास साध्य केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा देशातील जनतेसाठी सांगितले तेच केले. कुठेही मतांच्या तुष्टीकरणाला महत्व न देता सबका मालिक एक या मंत्रानुसारच देशाला पुढे घेवून जाण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.
कोव्हीड संकटानंतर देशाला मोठी आर्थिक स्थैर्य मिळाले असून, जगातील इतर देशांची अर्थव्यवस्था डळमळीत होत असताना भारत आज अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर आला आहे. फाईव्ह ट्रीलियन अर्थव्यवस्थेचे उदिष्ठ गाठण्यासाठी राज्यात महायुती सरकार असणे गरेजेचे असून, डबल इंजिन सरकार असेल तर या विकासाला अधिक गती येईल असा विश्वास व्यकक्त करुन, केंद्र सरकारने राज्याच्या विकासासाठी कराच्या माध्यमातून येणारा निधी चौपट केला असून, देशातील आणि राज्यातील गरीबीची टक्केवारीही कमी होत आहे. एैंशी टक्के लोकांना मोफत धान्य, चार कोटी लोकांना घरकुलाची योजना, आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाख रुपयांची मदत आणि आता ७० वर्षांपुढील जेष्ठ नागरीकांना पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच देण्याचा निर्णय झाला आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या मानधनात वाढ करण्याची भूमिका सुध्दा महायुती सरकारची असेल याकडे जे.पी नड्डा यांनी लक्ष वेधले.
शेतक-यांसाठी किसान सन्मान योजना केंद्र सरकारने सुरु केली. राज्यानेही आता ही योजना सुरु केली असून, भविष्यात या योजनेचे अनुदान १५ हजार रुपये करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जलजीवन मिशन योजना, अंतराष्ट्रीय महामार्ग, अंतरराष्ट्रीय विमानतळ यामध्ये अहिल्यानगरचाही समावेश असून, शिर्डी येथील विमानतळास ५९० कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असल्याचे जे.पी नड्डा यांनी सांगितले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भागाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले असून, निळवंडे धरण, खंडकरी शेतक-यांची जमीन याबरोबरीनेच आता श्रीक्षेत्र नेवासा येथे ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प उभारण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना आमची साथ असेल. महाराष्ट्र प्रगती साध्य करीत असताना ही शिर्डीची नगरीसुध्दा विकासामध्ये प्रथम स्थानावर येण्याच्या दृष्टीने संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.