लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-जाणते राजे असणाऱ्या शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत आपला जनाधार गमावला. त्यामुळे आता त्यांनी राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी बसावे, अशी तिखट टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर गुरुवारी त्यांनी अहिल्यानगर येथील लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवारांवर टीका केली. ते म्हणाले, शरद पवार जाणते राजे आहेत. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला जनाधार गमावला. त्यामुळे आता त्यांनी घरी बसावे. त्यांनी आतापर्यंत जनता व राज्याचे खूप वाटोळे केले. यापुढे त्यांनी ते करू नये.
विखे पाटलांनी यावेळी आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांवरही शरसंधान साधले. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. तर सत्ताधारी महायुतीची पिछेहाट झाली होती. त्यावेळी कुणीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केली नाही. ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज होती. तसेच निवडणूक नाकारण्याचीही गरज होती. जनमत बाजूने असले की ईव्हीएम चांगली, पण विरोधात गेले की वाईट अशी विरोधकांची गत झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे ते पळवाटा शोधत आहेत. त्यांनी आपण जनाधार गमावल्याचे मान्य करावे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी अनेक बेताल विधाने केली. त्याची शिक्षा त्यांना जनतेने दिली आहे.
विखे पाटलांनी यावेळी एकनाथ शिंदे नाराज असल्याचा दावा फेटाळून लावत मंत्रीपदाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असतील असेही ठणकावून सांगितले. एकनाथ शिंदे नाराज असल्याचे रान माध्यमांनी उठवले आहे. पण ते नाराज असण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांनी स्वतः भाजपचा जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल असे सांगितले आहे. आमची पहिली पसंती ही देवेंद्र फडणवीस यांना आहे.
संभाव्य मंत्रिपदांबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनाच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे वेगळे काही मागण्याची काहीच गरज नाही. पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आगहे. त्यानुसार ते मला चांगलीच जबाबदारी देतील याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे ते म्हणाले आहे.