संगमनेर दि.१,(प्रतिनिधी):-स्वत:ला महाविकास आघाडीचे नेते म्हणवून घेणारे नेतेच सोयीनुसार राजकारण करीत आहेत. पदवीधर निवडणूकीत यांना महाविकास आघाडी आठवली नाही,
महाविकास आघाडीच्या नेत्यांचे सोयीनुसार राजकारण :- ना. राधाकृष्ण विखे पाटील
कोल्हेवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे २७ कोटी रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजनेचा भूमिपुजन समारंभ व १ कोटी रुपयांच्या विकास कामांचा उद्घाटन समारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या निमित्ताने आयोजित केलेल्या जाहिर सभेत महाविकास आघाडीचे नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्यावर त्यांनी निषाणा साधला.
जेष्ठनेते बापुसाहेब गुळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस वंसतराव देशमुख, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतिष कानवडे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, सरचिटणीस जावेद जहागिरदार, भिमराज चत्तर, सुदामराव सानप, दिलीपराव शिंदे, शिवसेनेचे जनार्दन आहेर, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, शरद थोरात, संतोष रोहोम, कोल्हेवाडीच्या सरपंच सौ.सुवर्णा दिघे, सरपंच संदिप देशमुख, उपसरपंच मोहण वामन, चेअरमन पोपटराव कोल्हे, व्हा.चेअरमन सोपान खुळे, दादा गुंजाळ, अमोल दिघे, राहुल दिघे यांच्यासह सर्व विभागांचे आधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, अनेकांना आता सत्ता गेल्याचे दु:ख लपविता येत नाही. स्वत:च्या अस्तित्वासाठी फक्त महाविकास आघाडीचा उपयोग करणे सुरु झाले आहे. वैफल्यग्रस्त आणि नैराष्येच्या भावनेतून त्यांची फक्त पोपटपंची सुरु आहे. अनेक वर्षे केवळ ठेकेदार आणि वाळू माफीयांना पाठीशी घालण्याचे काम झाले. आताही ठेकेदारांना चुका दाखवयाला सुरुवात केली तर, नेत्यांनाच दु:ख होवू लागले आहे. तुम्ही नेमके समर्थन कोणाचे करता असा प्रश्न उपस्थित करुन, जलजीवन मिशन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या योजनेचे काम लोकांच्या मनाप्रमाणे व्हावे हाच आमचा प्रयत्न आहे. या योजनेत हलगर्जीपणा करणा-या कोणत्याही ठेकेदाराची सरकार गय करणार नाही असा इशाराही त्यांनी दिली.
महसूल विभागाच्या माध्यमातून वाळूचे धोरण आपण आणले आहे. यामध्ये सामान्य माणसाचे हित आपण पाहिले असून, वाळू तस्करी आता पुर्णपणे हद्दपार होईल असा विश्वास व्यक्त करतानाच सामान्य माणसाच्या घरापर्यंत अवघ्या ६५० रुपयात वाळू देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापुर्वी फक्त माफीयांनी खिसे भरले, महसूल आधिकारी, कर्मचा-यांनाही या माफीयांचा त्रास झाला, कित्येक सामान्य माणसाचे बळी गेले, वाळू तस्करीतील ही गुंडगिरी संपविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे खडेबोलही त्यांनी सुनावले.
ग्रामीण भागातील शेतशिवार, पाणंद रस्ते आणि मोजणीच्या प्रलंबित प्रकरणांबाबत जलदगतीने कार्यवाही होणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन, सामान्य माणसाला न्याय देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकाच अर्जावर आता दाखले उपलब्ध होणार असून, त्याची अंमलबजावणीही १५ दिवसात होईल. जनतेच्या मनातील हे सरकार असल्यामुळे जे जनतेला हवे आहे तेच निर्णय आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोव्हीड संकटात या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे दिलासा मिळाला. मागील अडीच वर्षे सरकारचे अस्तित्वही दिसले नव्हते. जिल्ह्याला तीन मंत्री होते परंतू एकही मंत्री जनतेपर्यंत पोहोचला नाही. स्वतं:ची रुग्णालये असूनही कोव्हीड सेंटर हे सुरु करु शकले नाही. पण या संकटातूनही देश आज आत्मनिर्भरतेने उभा आहे. मोदीजींचे नेतृत्व हे विश्वव्यापी झाले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळत आहे. आज राज्यातही शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून सामान्य माणसाचे हित जोपासले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पीकविम्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात शेतक-यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. आता शेतक-यांना अवघ्या १ रुपयात पीकविम्याचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, नमो किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतक-यांना १२ हजार कोटी रुपयांची मदत देण्याचे उदिष्ठ सरकारने ठेवले आहे. विकासाबरोबरच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी सरकारने पाऊले उचलली असून, शेतीपुरक व्यवसायातून रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
( सरकारने गुढीपाडवा ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय केला आहे. या किटचे वितरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले. जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा आता उपलब्ध झाला असून, याचा लाभ सर्वच घटकांना होईल असा विश्वास व्यक्त करुन, दिवाळीतही आनंदाचा शिधा घरपोहोच देवून सरकारने ही योजना यशस्वी केली असल्याचे त्यांनी सांगितले.)
(जलजीवन मिशन योजना हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. सरकारच्या पैशांचा विनियोग चांगल्या पध्दतीने व्हावा यासाठीच सरकारचा प्रयत्न आहे. यामध्ये ठेकेदारांची जबाबदारी मोठी आहे. योजनेमध्ये गैरप्रकार आपण खपवून घेणार नाही. कोणाला याचे दु:ख वाटत असले तरी, मला त्याची फिकीर नाही, जनतेच्या हितासाठी ठेकेदारांवर आमची दहशत राहीलच. आमच्या दहशतीची झाकणं उडविण्यापेक्षा तुमच्या कुकरच्या शिट्ट्या आणि झाकणं केव्हाच उडुन गेली आहेत असा टोला त्यांनी लगावला.)




