कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार भगवतीपूर येथे प्रभू श्रीराम नवमी व संत कैकाडी महाराज जयंतीनिमित्त यावर्षी प्रथमच संगीतमय तुलसी रामायण कथा व भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले.
काल्याचे कीर्तन, महाप्रसाद तसेच येथील श्रीराम मंदिरात विधीवत पूजन करण्यात आले.
श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने कोल्हार भगवतीपूर येथे श्रीराम नवमी उत्सव हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. भगवतीदेवी मंदिराच्या प्रांगणात रामायणाचार्य संदिप महाराज चेचरे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, प्रभू श्रीरामांनी जीवनभर जपलेली नीतीमुल्ये, सुसंस्कार, निष्ठा, जीवनतत्वे सर्वांसाठी अनुकरणीय आहेत. त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात आचरण करणे निश्चित फलदायी ठरेल. दहीहंडी फोडल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान येथील श्रीराम मंदिरात पारंपरिक विधीवत पूजन व महाआरती करण्यात आली. दिवसभर दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी होती. सायंकाळच्या सुमारास बस स्थानकशेजारी तयार केलेल्या मैदानात निकाली कुस्त्यांचा हगामा रंगला. गावात पहिल्यांदाच रामनवमीनिमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील महिला – पुरुष कुस्तीगीरांनी सहभाग नोंदविला. उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवार ( पारनेर ) यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस पटकावले. तर महाराष्ट्र चॅम्पियन केवल भिंगारे ( पुणे ) यांनी ५१ हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. याखेरीज विजेत्या कुस्तीपटूंना ३१ हजार, २१ हजार, ११ हजार, ५ हजार रुपयांपर्यंत इनाम देण्यात आले.
श्रीराम नवमीनिमित्त ५ दिवस दररोज रात्री भगवतीदेवी मंदिराच्या प्रांगणात रामायणाचार्य संदिप महाराज चेचरे यांचे संगीतमय तुलसी रामायण कथा सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्रीराम जन्मोत्सव समितीचे गणेश गागरे, सोमनाथ जाधव, भैय्या गोसावी, शुभम जाधव, विजय डेंगळे, सुभाष गायकवाड, केतन लोळगे, पवन निकम, योगेश बोरुडे, सुनील राऊत, योगेश साबळे, विरेंद्र गोसावी, दत्तात्रय जाधव, विक्की डंक आदि प्रयत्नशील होते.





