14.4 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

राहाता मधील निराधारांना ३ कोटी ८८ लाखांचे वितरण ! मार्चअखेर एकही लाभार्थी मदतीपासून वंचित नाही.पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जलद कार्यवाही..

शिर्डी, दि.३१ मार्च ( प्रतिनिधी) – राज्याचे महसूलमंत्री तथा ‍जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुका प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करत विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना ३ कोटी ८८ लाख ८० हजार रूपयांच्या अनुदानाचे वितरण केले आहे. गेल्या काही महिन्यापासून लाभापासून वंचित असलेल्या ११६०७ लाभार्थ्यांना मार्च २०२३ अखेरपर्यंतचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
आता एकही लाभार्थी अनुदानाच्या लाभापासून वंचित नाही. अशी माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे. 
 राज्य शासनाच्या वतीने वंचित घटकांसाठी विशेष सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असते. या विशेष सहाय्य योजनांच्या माध्यमातून राहाता तालुक्यातील १२१३२ लाभार्थ्यांना दर महिन्याला १ कोटी २१ लाख ७२ हजार रूपयांची मदत दिली जाते. यापैकी ११६०७ लाभार्थ्यांना मागील तीन महिन्यापासून अनुदान अभावी लाभ वितरित करण्यात आला नव्हता. अनुदान प्राप्त झाल्यानंतर सदर लाभार्थ्यांना तत्परतेने विशेष सहाय्याचे मानधन वितरित करण्यात आले आहे. 
राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन आदी योजना समाजातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येत असते. या योजनांमध्ये लाभार्थ्यांना कमीत कमी ६०० ते १००० रूपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येत असते. 
संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतंर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१,००० पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेत लाभापासून वंचित ४४०१ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १ कोटी ३९ लाख ७९ हजार १०० रूपयांचे अनुदान मार्चअखेर वितरित करण्यात आले आहे.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत 65 वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीना निवृत्ती वेतन देण्यात येत असते. या योजनेत लाभापासून वंचित ४३५६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १ कोटी ९३ लाख ७९ हजार २०० रूपयांचे अनुदान मार्चअखेर वितरित करण्यात आले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत दारिद्रय रेषेखालील ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती या योजनेत पात्र ठरतात. या योजनेत लाभापासून वंचित २६६३ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ४५ लाख ७० हजार ९०० रूपयांचे अनुदान मार्चअखेर वितरित करण्यात आले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या ४० ते ६५ वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून प्रतीमहा रु.200 व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत प्रतीमहा रु.400 असे एकूण प्रतीमहा 600 निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे. या योजनेत लाभापासून वंचित १५७ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २ लाख ५० हजार ८०० रूपयांचे अनुदान मार्चअखेर वितरित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत लाभापासून वंचित ३० लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ६ लाख रूपयांचे अनुदान मार्चअखेर वितरित करण्यात आले आहे. 
अनुदान लाभ वितरणासाठी नायब तहसीलदार भारती घोरपडे व संगणक चालक अमोल फोफसे यांनी मेहनत घेतली. अशी माहिती ही श्री.हिरे यानी दिली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!