नागपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं गेले असं सांगण्यात आले. मी सामान्य कार्यकर्ता, माझ्या मतदारसंघातील लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बोलू असं सांगत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.राज्य मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. त्यात आज छगन भुजबळ अधिवेशनासाठी नागपूरात आले तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नाराजी बोलून दाखवली.
छगन भुजबळ म्हणाले की, मी सामान्य कार्यकर्ता मला डावललं काय, फेकलं काय फरक काय पडतोय. मंत्रिपद कितीवेळा आले आणि गेले. छगन भुजबळ संपला नाही ना..ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं. अजित पवारांशी बोलण्याची गरज वाटली नाही. माझ्या मतदारसंघातील लोक आणि समता परिषदेचे कार्यकर्ते त्यांच्याशी मी बोलणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
त्याशिवाय ओबीसीची लढाई जी लढली त्यामुळे ओबीसी एकत्र झाले आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. ओबीसींचा पाठिंबा आणि लाडकी बहीण योजनेचा विजयात वाटा आहे. मला मंत्रिपद का घेतले नाही हे माहिती नाही. ज्यांनी घेतले नाही त्यांना प्रश्न विचारा. नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जातंय असं सांगितले असंही छगन भुजबळ बोलले.




