कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर – मनमाड महामार्गावर कोपरगाव येथील कातकडे पेट्रोल पंपा नजीक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कंटेनरचा रविवारी भीषण अपघात झाला.या अपघातात बस चालकासह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले असून एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस शिर्डीकडून छत्रपती संभाजी नगरकडे रविवारी दु. ४ वाजेच्या सुमारास प्रवाशी घेवून जात असताना कोपरगाव शहर हद्दीतील नगर मनमाड महामार्गावर बेट नाका परिसरात कातकडे पेट्रोल पंपासमोर कंटेनरला मागून जोराची धडक दिली.
यात बस चालकासह आशा विलास गायकवाड, आरती पठारे, कांताबाई डेंगळे, शांताबाई डेंगळे, आशा राजपूत, सुजाता सचिन लूनावत, सहारे कल्याण, सुनीता सचिन लूनावत असे आठ प्रवासी जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघात होताच कंटेनर चालक फरार झाला असून सदर अपघात हा ओव्हर टेकच्या नादात झाला असल्याचे समजते. याबाबत अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे.