मुंबई( जनता आवाज वृत्तसेवा ) :- महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले त्यानंतर हिवाळी अधिवेशन पार पडले व लगेच मंत्र्यांना खातेवाटप देखील झाले. यानंतर सरकार तातडीने कामकाजास सुरू झाले असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात महत्त्वाची बैठक घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल, मंगळवारी मंत्रालयात त्यांच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कृषी, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा या विभागांच्या सचिवांची बैठक पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी 100 दिवसांचा आराखडा आणि प्रमुख योजनांची स्थिती मांडली.
या बैठकीत परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांच्याकडील असलेल्या विभागांची बैठक मंत्रालयात घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त व नियोजन तसेच राज्य उत्पादन शुल्क मंत्रिपदाचे सूत्र हाती घेताच मंगळवारी दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या या दोन्ही विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच करसंकलन आणि महसूलवाढीच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणत रिझल्ट ओरियंटेड काम करण्याचे निर्देश अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा. करचोरी, करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देखील अजित पवारांनी दिला आहे.
या बैठकीत राज्यातील महसुली सुधारणा, शेती विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यासारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचना देत राज्याच्या महसूल वाढीसाठी करचोरी, करगळतीसह गैरकारभार रोखण्याच्या सूचना दिल्या.