श्रीरामपूर प्रतिनिधी):
नगर जिल्ह्यातील अतिसंवेदनशील तालुका म्हणून श्रीरामपूर ओळखले जाते. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील बाजारतळ परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून दोन सराईत आरोपींना ४ गावठी कट्टे आणि ८ जिवंत काडतुसे यांसह जेरबंद केले आहे.
त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आता श्रीरामपूर पोलीस पुढील तपास करून बेलापूर परिसरातील गावठी कट्टयांची पाळेमुळे शोधून काढणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे यांच्याविरुध्द धडक कारवाई करत आहेत. त्यानुसार कटके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी दत्तात्रय डहाळे रा.शिर्डी हा त्याच्या साथीदारासह गावठी कट्टे व जिवंत काडतुसे यांची विक्री करण्यासाठी बेलापुर बुद्रुक ता.श्रीरामपुर बाजारतळ परिसरात येणार आहे.या माहितीवरून अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन कारवाई करण्याचे आदेश दिले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ मनोहर गोसावी, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, पोहेकॉ सुरेश माळी, पोहेकॉ संदिप घोडके, पोना विशाल दळवी,पोना शंकर चौधरी,पोना दिलीप शिंदे, पोना संदिप चव्हाण, पोकों सागर ससाणे, पोकॉ रोहित येमुल, पोकों रणजित जाधव व चापोहेकॉ उमांकात गावडे, चापोहेकॉ अर्जुन बडे यांनी वेशांतर करुन मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने बेलापुर बु. येथील बाजारतळ येथे सापळा लावला. मिळालेल्या माहिती प्रमाणे रेकॉर्डवरील आरोपी दत्तात्रय डहाळे व त्याच्या सोबत एक जण बेलापुर बु॥ बाजार वेशीतून बाजारतळाकडे पायी येताना दिसल्याने पथकाची खात्री पातळी आणि पथकाने त्यांच्यावर झडप घालत त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नावे दत्तात्रय सुरेश डहाळे, वय ३४ रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता जि. अहमदनगर तर सुलतान फत्तेमोहमद शेख, वय २९ रा. महलगल्ली, बेलापुर बु. ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतले.
त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून ४ देशी बनावटीचे पिस्टल व ८ जिवंत काडतूसे असा १ लाख ४५ हजार ७०० रु. किमतीचा मुद्देमाल पोलीसांना मिळून आला आहे. यातील दत्तात्रय सुरेश डहाळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी संभाजीनगर जिल्हयात अग्नीशस्त्र बाळगणे यासह खुनाचा प्रयत्न करणे असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो फरार होता. सदर घटनेबाबत पोहेकॉ मनोहर सिताराम गोसावी नेम. स्थागुशा, अहमदनगर यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म अॅक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपस श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. दरम्यान बेलापुर येथे पोलिसांनी केलेली ही कारवाई म्हणजे हिमनगाचे टोक असून परिसरात सुमारे 25 ते 30 गावठी कट्टे असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यामुळे बेलापूर परिसराची शांतता धोक्यात आली असून यापुढेही पोलिसांनी अशाच प्रकारे धडक कारवाई करून गावठी कट्टयांचा शोध घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर,पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.





