शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायाबरोबरच इतर कुटीर व्यवसाय सुरु करुन, रोजगार निर्मितीवर भर दिला जातो. या छोट्या व्यवसायातून अनेक शेतक-यांनी चांगल्या पध्दतीची आर्थिक प्रगतीही केली आहे. या व्यवसायाकडे आता ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाल्याचे महापशुधन प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहायला मिळाले. या प्रदर्शनात विविध लघु उद्योगांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागले आहेत. या स्टॉलवर लघु उद्योगातून निर्मित झालेल्या उत्पादनांची माहिती घेण्यासाठी तरुण शेतकरी आणि महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. लघु उद्योगा बाबत तज्ज्ञांकडून माहिती घेण्याची उत्सुकताही दिसून आली.
अकोले तालुक्यातील कळसूबाई महिला बचत गटाने तृणधान्याचा मंगल कलश महापशुधन प्रदर्शनात
शिर्डी दि.२५ प्रतिनिधी:-शेती पुरक व्यवसाच्या माध्यमातून लघु उद्योग सुरु करण्याची उत्सुकता महापशुधन प्रदर्शनाच्या निमित्ताने युवक शेतक-यांना पाहायला मिळाली. यासाठी लघु उघेगाच्या दालनामध्ये तरुण शेतकरी माहिती जाणून घेत असून, कृषि विभागाने तृणधान्याचा तयार केलेला मंगल कलशही प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरला आहे. वेगवेगळ्या जातीच्या पशुपक्षांची माहिती घेण्यासाठी प्रदर्शनस्थळी अबालवृध्दांची मोठी गर्दी लोटली आहे.
दुग्ध व्यवसाय करण्याकडे आता मोठ्या प्रमाणात तरुण शेतक-यांचा ओढा दिसतो. यासाठी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले शेतकरी प्रामुख्याने गोवंशाची जनावरे पाहतांना दिसत आहेत. दुध उत्पादनाच्या वाढीसाठी कोणते पुशखाद्य द्यावे,पशुखाद्यांमध्ये न्युट्रीन प्रोटीन कसे असावे याची माहितीही उत्सुकतेने जाणून घेत आहेत. शनिवारी दुध उत्पादक शेतक-यांसाठी विशेष चर्चासत्र संपन्न झाले. यामध्ये सुध्दा दुग्ध व्यवसाय करण्याबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून या शेतक-यांना मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे वर्ष अंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तृणधान्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कृषि विभागाने विशेष पुढाकार या प्रदर्शनाच्या निमित्ताने घेतला आहे. अकोले तालुक्यातील कळसूबाई महिला बचत गटाने तृणधान्याचा मंगल कलश या प्रदर्शनात मांडला असून, तृणधान्य उत्पादनासाठी शेतक-यांना प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न कृषि विभागाच्या आधिका-यांनी प्रदर्शनाच्या निमित्ताने केला आहे.
या प्रदर्शनात कृषि विभागाने शासकिय योजनांच्या माहीतीचे स्वतंत्र दालन उभारले आहे. शेतीसाठी असलेल्या योजनांची माहिती जाणून घेण्याकडेही शेतक-यांचा कल दिसतो. यंदाच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृताची संकल्पना मांडली. या संकल्पनेला कृषि विभागाने प्राधान्य देवून, शेतक-यांच्या यशोगाथाही मांडल्या आहेत.





