4.6 C
New York
Thursday, December 5, 2024

Buy now

spot_img
spot_img

दीड कोटी पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्यसरकार संवेदनशील ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे उद्घाटन

शिर्डी, दि.२४ मार्च, २०२३ (उमाका वृत्तसेवा) – शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्यसरकार संवेदनशील आहे. पशुधनाच्या लम्पी आजारांवरील मोफत लसीकरणासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे राज्यात दीड कोटी पशुधनाचे कमी कालावधीत विक्रमी मोफत लसीकरण व उपचार करण्यात आले. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना ९४ हजार कोटींची मदत करण्यात आली. शंभर टक्के लसीकरण व सर्वाधिक मदत देणाऱ्या राज्यात महाराष्ट्र राज्य देशातील एकमेव राज्य असल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. 
राज्यशासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्यावतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री अब्दुल सत्तार होते. 
पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, शेतीला पुरक असा जोडधंदा म्हणून पशुधन व्यवसायाकडे पाहिले जाते. दूग्ध व कुक्कुटपालन व्यवसायाला नवीन दिशा मिळावी, नव-नवीन तंत्रज्ञानाचा पशुधन व्यवसायाला फायदा झाला पाहिजे. यासाठी ‘महापशुधन एक्स्पो’ आयोजित करण्यात आला आहे. शेळी-मेढी पालनाला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या महामंडळाचे राज्याचे मुख्यालय अहमदनगर असणार आहे. यासाठी वार्षिक दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे‌. हा व्यवसाय करणाऱ्या तरूणांना १ लाख ७५ हजार रूपयांचे बिन व्याजी कर्ज दिले जाणार आहे‌. 
पशुधनाच्या लसीच्या निर्मितीत स्वयंपूर्ण होण्यासाठी पुण्यात  ७० कोटी रूपये खर्चून प्रयोगशाळा उभारण्यात आली असून सप्टेंबर २०२३ पासून प्रत्यक्ष लसीच्या उत्पादनाला सुरूवात होणार आहे. यामुळे महाराष्ट्र देशाला लस पुरविणार आहे. कृत्रीम कार्यक्रमात बदल करून ९५ टक्के मादी पशुधन निर्माण होतील यासाठी प्रयत्न आहेत. गायींच्या जतन, संवर्धनासाठी गो-सेवा आयोग विधेयक मांडण्यात आले आहे. असे पशुसंवर्धन मंत्री श्री. विखे-पाटील पाटील यांनी सांगितले. 
अहमदनगर जिल्ह्यापुढे सर्वात मोठे आवाहन दूध भेसळीचे आहे. असे स्पष्ट करत श्री. विखे-पाटील म्हणाले, नवीन कायदा आणून दूध भेसळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल. तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात येईल. यावर सर्वसामान्य नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात. असे आवाहन ही पशुसंवर्धनमंत्र्यांनी केले. सावळीविहिर येथील शेती महामंडळाच्या जागेवर नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय बांधण्यात येईल. अशी घोषणा ही‌ श्री. विखे-पाटील यांनी यावेळी केली.
जिल्ह्यातील अवकाळी नुकसान
 *भरपाई महिनाभरात देणार –कृषीमंत्री अब्दुल सत्तार*
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात महिनाभराच्या आत नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल. अशी ग्वाही कृषीमंत्री‌ अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. 
‘महापशुधन एक्स्पो’ मध्ये ३०० स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. विविध प्रजातीचे पशुधन या ‘महापशुधन एक्सपो’ मध्ये सहभागी झाले आहेत.  प्रदर्शनाचे नियोजन उल्लेखनीय आहे. केवळ १ रुपयांमध्ये शेतकऱ्यांना विमा देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी  योजनेद्वारे केंद्र व राज्यशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपयांचा वैयक्तिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ च्या आयोजना मागील भूमिका विशद केली. 
पशुसंवर्धन विभागाचे राज्याचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी आपल्या मनोगतात जनावरांच्या ‘लम्पी’ आजाराविषयी शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. 
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, ‘महानंदा’चे चेअरमन राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई विखे – पाटील, पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, अरुण मुंढे,  कृषी विभागाचे आयुक्त सुशिलकुमार चव्हाण, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, अहमदनगर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते. 
 
यावेळी ‘पशुसंवर्धन दैनंदिनी’, ‘योजनांच्या घडी पुस्तिका’ व ‘सुलभ शेळीपालन’ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त शितलकुमार मुकणे यांनी केले. अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनिल तुंबारे‌ यांनी आभार व्यक्त केले.
२५ व २६ मार्च २०२३ रोजी ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुला असून याचा लाभ घ्यावा. असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!