शिर्डी दि.२३ प्रतिनिधी:-देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे दि.२४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. शेती महामंडळांच्या ४६ एकर जागेवर होणाऱ्या या प्रदर्शनात देशातल्या १६ राज्यातील पशुधनाच्या ६५ प्रकारांच्या जातीवंत प्रजाती आपणास पाहण्यास मिळणार आहेत. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात देश-राज्यपातळीवर ५ लाख पशुप्रेमी नागरिक भेट देण्याची शक्यता आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर होणारा हा ‘महापशुधन एक्स्पो’ शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी पर्वणी ठरणार आहे. अशी माहिती खासदार डॉ.सुजय विखे यांनी आज शिर्डी येथे दिली.
‘महापशुधन एक्सपो २०२३’ संदर्भात खासदार विखे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे राज्याचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, अतिरिक्त आयुक्त शितलकुमार मुकणे, अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनिल तुंबारे आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे उद्धाटन २४ मार्च २०२३ रोजी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव जे.पी.गुप्ता तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत.
खासदार विखे म्हणाले, शेतकऱ्यांची उपजिविका पशुधनावर अवलंबून असते. देशातील विविध राज्यातील शेतकरी आपली उत्पादकता वाढविण्यासाठी पशुधनाच्या कोणत्या प्रजातींचा वापर करते. त्यासाठी वापरले जाणारे नवीन तंत्रज्ञान या विषयांवर विचारांचे आदान-प्रदान व्हावे. चर्चा, परिसंवादातून मंथन घडावे. यासाठी या प्रदर्शनात देशपातळीवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ पशुपालकांना होणार आहे. या प्रदर्शनात जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले आहे. २४ मार्च रोजी स्थानिक विद्यार्थ्यांनी तयार केलेले रामायण महानाट्य, २५ मार्च रोजी चला हवा येऊ द्या व २६ मार्च रोजी महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम होणार आहे. जनसेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून प्रदर्शनात भेट देणाऱ्या राहाता व शिर्डी परिसरातील नागरिकांसाठी १०० बसेसच्या विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजनांच्या माध्यमातून या प्रदर्शनासाठी पशुसंवर्धन विभागास अडीच कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. असे खासदार विखे यांनी सांगितले.
पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह म्हणाले, पशुधनाच्या संशोधनाच्या बाबतीत देशपातळीवर नावाजलेले संस्थांचे संशोधक, वैज्ञानिकांचे या प्रदर्शनात मार्गदर्शन लाभणार आहे. महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांच्या स्टॉलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचे पशुसंवर्धनविषयक वैशिष्ट्यांची माहिती सर्वसामान्य जनतेसाठी खुली असणार आहे. नागपूर येथील महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे ५०० विद्यार्थी प्रदर्शनात सक्रीय सहभाग घेणार आहेत.
देशपातळीवर गाय-म्हैशी यांना आता १२ अंकी युनिव्हर्सल नंबर देण्यात येणार आहे. याबाबतच्या टॅगिंग तंत्रज्ञानाची माहिती ही प्रदर्शनात दिली जाणार आहे. लम्पी, बर्ड फ्ल्यू व इतर पशुविषयक आजारांविषयी जनजागृती, दक्षता विषयक मार्गदशन सत्र या प्रदर्शनात होणार आहेत.
‘महापशुधन एक्स्पो ‘हा पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पध्दतीने पशु-पक्षी पालन करण्यासाठी शेतकरी, पशुपालक व युवकांसाठी पर्वणी ठरणार आहे. असे सचिन्द्र प्रताप सिंह यांनी यावेळी सांगितले.