कोल्हार खुर्द (वार्ताहर) : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यांना एकत्र आणून त्यांचा गुणगौरव व स्नेह मेळावा आयोजित करून कोल्हार खुर्द येथील पाटीलवाडी शाळेने एक अनोखा कार्यक्रम आयोजित केला. आणि माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यांच्या भूतकाळातील आठवणी जागवल्या.
कोल्हार खुर्द व परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटीलवाडी ही गुणवत्तापूर्ण व शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली जिल्हा परिषद शाळा असून तेथे अनेक आगळेवेगळे उपक्रम राबविले जातात. आता नुकताच माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यांना एकत्र आणून त्यांच्या स्नेहमेळाव्याने जुन्या शिक्षक व विद्यार्थ्यांना भूतकाळाची आठवण करून दिली.जवळपास १९३५ पासूनचे माजी विद्यार्थी व शिक्षक तसेच या शाळेत शिक्षण घेऊन उच्च पदावर असलेल्या वैद्यकीय, अभियांत्रिकी, शैक्षणिक तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व माजी विद्यार्थी व शिक्षक यांना मोठया प्रयत्नाने एकत्र आणून १९३५ साली असलेल्या विद्यार्थ्यांची पिढी व आताच्या दहा वर्षातील विद्यार्थ्यांची पिढी यातील अंतर कमी करून त्यावेळचे अनुभव त्यावेळच्या विध्यार्थ्यांच्या शब्दात व आताचे अनुभव आजच्या विध्यार्थ्यांच्या ओठातून ऐकण्याचा एक सुवर्ण योग या पाटीलवाडी शाळेत पहावयास मिळाल्याने या सर्व माजी शिक्षक व विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर व शब्दांत एक अनोखा आनंद दिसून आला.आजच्या धकाधकीच्या जीवनात दोन पिढ्यामधील संवाद हरवत चालला असून अशा प्रकारच्या कार्यक्रमातुन जेष्ठांची पिढी सोशल मीडियाच्या काळातील पिढी यांच्यातील विचारांची देवाणघेवाण यानिमित्ताने पहावयास मिळाली.
या शाळेत बाप पिढी व मुलगा पिढी यांचा सुरेख असा संगम पहावयास मिळाल्याचे वर्णन येथील माजी शिक्षक सेवानिवृत्त असलेले लक्ष्मण मंजुळा नलगे केले. यावेळी संगिता देशमुख, वसंत वाकचौरे,बाळासाहेब गांगर्डे, संतोष वैष्णव आदींसह माजी शिक्षक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका मनिषा गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन शिक्षक प्रविण शिरसाठ यांनी केले तर आभार मुख्यध्यापक बबन ओहोळ यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष अकबर शेख,उपाध्यक्ष मच्छिंद्र तरकसे ,बाळासाहेब पवार यांचेसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.