22.8 C
New York
Monday, September 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीतून राज्य देशाला दिशादर्शक ठरले -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-  केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत जमिनीची मोजणी करणाऱ्या स्वामित्व योजनेअंतर्गत देशभरातील ६५ लाख लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने मिळकतपत्रिकांचे वितरण करण्यात आले. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अविनाश मिसाळ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना प्रा.राम शिंदे म्हणाले, ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन या आधुनिक तंत्रांचा उपयोग करत नागरिकांच्या मालमत्तांचे संवर्धन आणि संरक्षण करणारी ही स्वामित्व योजना आहे. अहिल्यानगर जिल्हा नेहमीच राज्याला दिशा देणारा जिल्हा आहे. ग्रामीण भागामध्ये मालमत्तांच्या भेडसावणाऱ्या प्रश्नाच्या मूळाशी जाऊन अत्यंत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. आधुनिक तंत्राच्या सहाय्याने नागरिकांच्या मालमत्तांचे संवर्धन आणि संरक्षण यातून होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तत्कालिन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही योजना राज्यात अत्यंत यशस्वीपणे राबविली. योजनेतून ग्रामीण समुदायांच्या आर्थिक समावेशनात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि एकूणच सामाजिक-आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जात असल्याचेही ते म्हणाले.

विकसित भारत देशाचे स्वाभिमानी आणि अभिमानी नागरिक म्हणून प्रत्येकाने स्वच्छतेची सवय अंगिकारली पाहिजे. आपले घर,गाव,तालुका व जिल्हा स्वच्छ करण्याबरोबरच आरोग्यासाठी घातक असलेल्या नशा आणणाऱ्या पदार्थाच्या सेवनापासून दूर राहिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरामध्ये ग्रामीण विकासाला नवी चालना देण्याच्यादृष्टीने स्वामित्व योजना राबविण्यात येत आहे. आपल्या राज्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात २०१९ मध्ये या योजनेची अंमलबजावणी करत २३ लक्ष ३३ हजार मिळकतपत्रिकांचे वाटप केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतून आपले राज्य देशाला दिशादर्शक ठरले असल्याने याचा सार्थ अभिमान असल्याचे ते यावेळी म्हणाले.

स्वामित्‍व योजनेतून ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे एक महत्वाचे पाऊस आज या निमित्ताने टाकण्यात आले असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील म्हणाले, आपल्या जिल्ह्यात ८१ ठिकाणी ६०४ गावांतून ५७ हजार ७३१ मिळकतपत्रिकांचे वाटप या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. योजनेतून शहरी विकासाबरोबरच ग्रामीण भागाचा विकास साधण्यात येणार आहे. ग्रामीण भागामध्ये अनेकवेळा घरगुती तसेच शेती जमीनीचे वाद होताना दिसतात. परंतू स्वामित्व योजनेतून ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या सर्व्हेमुळे हे वाद संपुष्टात येऊन नागरिकांना त्यांच्या मिळकतीचा दाखला अत्यंत सहज व सुलभपणे मिळणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

जल, जंगल आणि जमीन या त्रिसूत्रीवर आधारित देशाच्या विकासाचे नवीन पर्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झाले आहे. विकसित भारताच्या संकल्पनेला या योजनेतून अधिक गतीने चालना मिळून प्रत्येक नागरिकाला त्यांचा अधिकार प्राप्त होणार आहे. योजनेतून गावाच्या विकासाबरोबरच नागरिकांचा विकासही अत्यंत वेगाने होणार असल्याचेही जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी अविनाश मिसाळ यांनी स्वामित्व योजनेची माहिती विषद केली.

याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना मिळकतपत्रिकांचे, महाज्योती संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टॅबचे वितरणही करण्यात आले.उपस्थितांना स्वच्छतेची व नशामुक्तीची शपथही यावेळी देण्यात आली.कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह मालमत्ताधारक उपस्थित होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!