कर्जत (जनता आवाज वृत्तसेवा):-भरदिवसा कर्जतमध्ये तरुण आडत व्यापाऱ्याला मार्केट कमिटीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर अडवले. डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून व पिस्टलचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न. व्यापाऱ्याच्या सावधगिरीमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेने कर्जत शहरात मोठी खळबळ उडाली आहे. कर्जत शहर व्यापारी असोसिएशन या घटनेचा निषेध केला आहे. दोन आज्ञात चोरट्यांच्या विरोधात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत येथील प्रसिद्ध अडत व्यापारी प्रफुल्ल पंढरीनाथ नेवसे यांचा मुलगा रामराजे वय 21 वर्ष हा आज नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेतीमालाचे पैसे देण्यासाठी दीड लाख रुपये घेऊन बुलेट दुचाकी क्रमांक एम एच सोळा डी ए 5000 यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे येत असताना प्रवेशद्वाराच्या जवळच काही अंतरावर दोन अज्ञात चोरटे हे काळ्या रंगाच्या पल्सर गाडी यावर बसून आले दोघांनी जीनची पॅन्ट , जॅकेट, त्याची टोपी डोक्यावर केलेली व पांढऱ्या रंगाच्या रुमालाने पूर्ण चेहरे झाकलेले आले व त्यांनी तू चाकी आडवी लावली. रामराजे यांनी बुलेट उभी करताच एका जणांनी डोळ्यांमध्ये मिरची पूड फेकली. त्यांनी चेहरा बाजूला केला यामुळे ती मिरची पूड शर्टवर पडली . व्यापारी रामराजे नेवसे यांच्या सर्व प्रकार लक्षात आला.
त्यांनी तात्काळ बुलेट सोडून दिली आणि गळ्यातील पैशाची बॅग घट धरली. चोरट्याने बॅग हिसकवली मात्र रामराजे यांनी बॅग सोडली नाही व चोरट्या बरोबर झटापटी केली. आणि जोर जोरात आरडा ओरड देखील केली. आवाज ऐकून मार्केट यार्ड मधून काही लोक त्या ठिकाणी धावत येऊ लागतात चोरटा दुसऱ्या साथीदाराच्या मोटरसायकल कडे वळाला त्यावेळी त्याच्या कमरेला असणारे पिस्टल खाली पडले. क्षणाचाही विलंब न करता रामराजे यांनी ते पिस्टल उचलले आणि चोरट्याच्या दिशेने रोखले. हे पाहून चोरटा जोरात पळाला व साथीदाराच्या दुचाकी वर बसून राशीन रोड कडे तू चाकी घेऊन चोरटे पळून गेले. या झटाटपटीमध्ये व्यापारी रामराजे नेवसे याच्या पायाला इजा झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अनेक व्यापारी नागरिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडे एकत्र आले दरम्यान घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक श्री मुलानी हे पोलिसांसह आले त्यांनी ते पिस्टल जप्त केले आहे.
पाळत ठेवून लुटण्याचा प्रयत्न
व्यापारी असलेले रामराजे नेवसे यांच्यावर मागील काही दिवसांपासून या चोरट्यांनी पाळत ठेवली असावी. कारण ते बरोबर व्यापारी किती वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज पैसे घेऊन येतो याचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यानुसार ती तयारीनेच या परिसरामध्ये थांबलेले होते. कशा पद्धतीने व कोठे अडवायची आणि पैशाची बॅग कशी पळवायची याची योजना त्यांनी बरोबर आखलेली होती . काही जणांनी त्यांना त्या परिसरामध्ये पाहिली देखील मात्र कोणाची तरी वाट पाहत असतील यामुळे कुणी त्यांना हटकले नाही.
पिस्टल चा वापर झाला असता तर..
सुदैवानं या घटनेमध्ये चोरट्यांनी पिस्टलचा वापर केला नाही. जर त्याने हल्ला करण्याच्या वेळीच पिस्टलचा वापर केला असता तर मोठा अनर्थ घडला असता..
सीसीटीव्ही फुटेज मिळाले
दरम्यान हे दोन चोरटे कर्जत शहराच्या दिशेने आलेले सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे. दोघांच्या अंगावर फुल जॅकेट. होते तसेच त्यांनी तोंडाला पांढरे रुमाल बांधलेले होते.
दरम्यान या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असन त्यांनी या घटनेचा निषेध करत व्यापाऱ्यांना पुरेशी संरक्षण मिळावे असे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीला मेन रोडपासून प्रवेशद्वाराच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. तसेच एक सुरक्षारक्षक कायमस्वरूपी नेमण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे. उपसभापती अभय पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी संचालक नंदकुमार नवले, प्रफुल्ल नेवसे,सराफ व्यापारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शहाणे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भीभीषण खोसे, रवींद्र कोठारी,प्रसाद शहा, राम ढेरे, उपमनु शिंदे, विशाल छाजेड,सचिन बोरा,सुरेश नहार,सुषेन कदम, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, नगरसेवक भास्कर भैलुमे, रवींद्र सुपेकर, अनिल गदादे, धनंजय आगम, अतुल धांडे, यांचे सह अनेक जण उपस्थित होते.