-0.1 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

spot_img
spot_img

शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची भूमिका सरकारची-महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

राहाता दि.१९ प्रतिनिधी:-अवकाळी पावसाने नुकसान झालेल्‍या शेती पिकांचे पंचनामे करण्‍याचे आदेश यंत्रणेला देण्‍यात आले असून, सरकारी कर्मचा-यांचा संप सुरु असला तरी, पंचनाम्‍याचे काम थांबणार नाही. या संकटाच्‍या काळात शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची भूमिका सरकारने घेतली असून, पुर्वीप्रमाणेच शेतक-यांना नुकसान भरपाई देण्‍याची भूमिका सरकारची राहिल. शेतक-यांनी घेतलेल्‍या शेती पिकांच्‍या कर्जाबाबतही मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्र्यांशी बोलून लवकरच निर्णय करु अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी शेतक-यांना दिली.
       तालुक्‍यासह जिल्‍ह्यात अतिवृष्‍टी आणि गारपीटीने झालेल्‍या राजुरी, ममदारपूर या गावांमध्‍ये जावून शेती पिकांच्‍या नुकसानीची पाहाणी मंत्री विखे पाटील यांनी आधिका-यां समवेत केली. तसेच जिल्‍ह्यात झालेल्‍या  नुकसानीचा आढावा त्‍यांनी बैठकीच्‍या माध्‍यमातून आधिका-यांकडून जाणून घेतला. जिल्‍ह्यात मागील दोन दिवसात झालेल्‍या गारपीठ आणि पावसाने अंदाजे २ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले असल्‍याची प्राथमिक माहिती मंत्री विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली.
       याप्रसंगी जिल्‍हा अधिक्षक कृषि आधिकारी शिवाजी जगताप, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय कृषि आधिकारी सुधाकर बोराळे, तहसिलदार कुंदन हिरे, भाजपाचे तालुका अध्‍यक्ष दिपक पठारे, गिरीधर आसणे, मारुतीराव गोरे, सतिष ससाणे, डॉ.सोमनाथ गोरे, प्रकाश गोरे, सुधाकर गोरे, सरपंच संगिता पठारे, सुरेश कसाब, राहुल गोरे, विशाल गोरे, शिवाजी गोरे, दिलीप यादव, विजय इनामके, विजय जवरे आदि आधिकारी यावेळी उपस्थित होते.
       बहुतेक गावांमध्‍ये द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवघ्‍या दोन ते तीन दिवसात जो माल काढून बाजारात विक्रीसाठी पाठवायचा होता तो मालच आता गारपीटीने मातीमोल झाल्‍याने हवालदिल झालेल्‍या द्राक्ष उत्‍पादकांसह कांदा, गहु, हरबरा, मका या पिकांसाठी सुध्‍दा मोठा फटका या गारपीटीचा बसला असल्‍याचे विखे पाटील यांनी सांगितले. श्रीरामपूर तालुक्‍यातील भोकर येथील राजु नामदेव मोरे यांचा वीज पडून मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या कुटूंबियांना तातडीची मदत म्‍हणून ४ लाख रुपये देण्‍याच्‍या सुचना आधिका-यांना देण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
       यापुर्वी राज्‍यात अतिवृष्‍टीमुळे नुकसान झालेल्‍या शेतक-यांना निकष बदलून मदत देण्‍यात आली होती. त्‍याच पध्‍दतीने आता पुन्‍हा शेतक-यांना मदतीसाठी शासनाची तयारी असल्‍याचे सांगून मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, नुकसानीच्‍या पंचनाम्‍यांचे आदेश देण्‍यात आले आहेत. सरकारी कर्मचा-यांचा संप सुरु असला तरी, या संकटकालीन परिस्थितीत सरकार प्रमाणेच सरकारी कर्मचा-यांनी सुध्‍दा शेतक-यांच्‍या पाठीशी उभे राहण्‍याची भूमिका घ्‍यावी. या कर्मचा-यांनाही सरकारच्‍या वतीने आवाहन करण्‍यात येत असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.
       पीकविम्‍याच्‍या बाबतीत यापुर्वी कंपन्‍यांकडून शेतक-यांची फसवणूक झाली. ही परिस्थिती बदलविण्‍यासाठीच उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्‍या अर्थसंकल्‍पात शेतक-यांना आता १ रुपयात विमा देण्‍याची भूमिका घेतली असून, शेतक-यांना याची कोणतीही आर्थिक झळ बसणार नाही. यासाठी सरकारने सर्व आर्थिक तरतुद केल्‍याचेही विखे पाटील यांनी सांगितले.
       अतिवृष्‍टी आणि गारपीटीमुळे नुकसान झालेली सर्व माहिती समोर आल्‍यानंतरच मदतीचा निर्णय शासन स्‍तरावर घेतला जाईल. परंतू आधिवेशना दरम्‍यान सभागृहातही मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्र्यांनी मदतीची ग्‍वाही दिलेली आहेच. नुकसानीचे निेकष पाहून मदतीबाबत निर्णय होतीलच परंतू यापेक्षाही शेतक-यांनी शेती पिकासाठी जिल्‍हा  सहकारी बॅंक तसेच राष्‍ट्रीयकृत बॅंकाकडून घेतलेल्‍या कर्जाचे मोठे प्रश्‍न  आता निर्माण होणार आहेत. याबाबतही शेतक-यांना दिलासा देणारी भूमिका सरकारला घ्‍यावी लागेल यासाठी आपण मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्र्यांना विनंती करणार असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.
       सरकारी कर्मचा-यांच्‍या सुरु असलेल्‍या संपाबाबत आपली प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना मंत्री ना.विखे पाटील म्‍हणाले की, जुन्‍या पेन्‍शन योजनेबाबत सरकारने आता तीन वरिष्‍ठ आधिका-यांची समिती नेमून यामध्‍ये मार्ग काढण्‍याचा निर्णय घेतला आहे. परंतू सरकार त्‍यांच्‍या  मागण्‍यांबाबत सकारात्‍मक आहे. याबाबतचे आश्‍वासन विधानसभेच्‍या  आधिवेशनातही देण्‍यात आले आहे. कर्मचारी संघटनांनी सुध्‍दा याबाबत विचार करुन, सरकारला आता सहकार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!