श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- पक्षामध्ये ज्येष्ठ असो, जुना असो नाहीतर नवा असो, घरात बसून यापुढे कोणालाही पदे मिळणार नाही, जो काम करेल त्यालाच पदे. नव्या जुन्यांचा वाद मिटवा, प्रकाश चित्तेंना बरोबर घ्या. सदस्य नोंदणीमध्ये जो चांगले काम करेल त्यांनाच यापुढे न्याय दिला जाईल. आपल्याला पुढे-पुढे करणारे लोक आवडत नाही, काम करणारे लोक आवडतात, असे स्पष्ट मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
श्रीरामपुर येथील व्हिआयपी गेस्ट हाऊसवर काल, सकाळी माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी बैठक घेतली. डॉ. विखे यांनी दिलेल्या बैठकीच्या 8.30 च्या वेळात ते स्वतः हजर झाले. त्यामुळे काही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीच्या स्थळी जाण्यासाठी चांगलीच धांदल उडाली.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी अत्यंत स्पष्टपणे श्रीरामपूरच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना सुनावले. नवा जुना वाद करू नका, सर्वांनी एकत्र घेवून काम करा, प्रकाश चित्ते यांनी पक्षासाठी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना बरोबर घेवून आपसातील मतभेट बाजूला करत एकत्रिक काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
आपल्याला तळागाळातील माणूस घडवायचा आहे, जो पक्षासाठी धडपड करेल, पक्ष सदस्य नोंदणीत चांगले काम करेल, त्याचेच काम करा, असे सांगतानाच भविष्यातही उमेदवारी देताना काम करणाऱ्या माणसाला आपण संधी देणार आहे, असेही डॉ.विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी नितीन दिनकर, शरद क्वले, अभिषेक खंडागळे, गिरीधर आसने, गणेश मुदगुले, रवी पाटील, नाना शिंदे, केतन खोरे, दिपक चव्हाण, मारूती बिगले, सतीश सौदागर, भाऊ बाई, मिलिंदकुमार साळवे, डॉ. मुठे, पाऊसाहेब पवार, पुष्पलता हरदास आदीसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, या बैठकीला भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पठारे अनुपस्थीत होते.
श्रीरामपूर भाजपला बुस्टर मिळण्याची शक्यता
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून श्रीरामपूर भाजपात दुफळी, तिफळी झाल्याचे दिसत होते. परिणामी विधानसभा निवडणुकीत सुमार कामगिरी झाली. गटा-तटामुळे कणखर भूमिका घेतली जात नव्हती. आज डॉ. सुजय विखे पाटील यांनी बैठक घेवून कार्यकर्त्यांना नवा-जुना बाद मिटवायला तर लावलाय परंतु, जो काम करेल त्याला पद तसेच पुढे-पुढे करणान्यांना आपल्याकडे थारा नाही, असे स्पष्ट सांगितल्याने कार्यकत्यांमधील मरगळ जाऊन त्या निमित्ताने श्रीरामपूर भाजपला बुस्टर मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.



