नेवासा फाटा (प्रतिनिधी) :नेवासा फाटा येथे समाज विकास समिती आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भव्य महिला जागृती मेळावा संपन्न झाला.
नेवासा फाटा येथील ज्ञानमाता हॉस्टेलच्या प्रांगणात भरलेल्या या भव्य महिला जागृती मेळाव्यासाठी नेवासा तालुक्यातून विविध महिला बचत गटाच्या सदस्या हजर होत्या. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षा सिस्टर अॅनीजोसेफ, नेवासा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिराज सूर्यवंशी, सिस्टर रोझारिया, सिस्टर बिंदू यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने झाली. दीप प्रज्वलनानंतर विद्यार्थिनींनी स्वागत गीत व सुंदर असे नृत्य प्रमुख पाहुण्यांसमोर सादर केले.
अध्यक्षीय भाषणात सिस्टर अॅनीजोसेफ यांनी
फक्त लग्न करून आणि घर मुले सांभाळून महिला सक्षम होत नाही. तर महिलांनी पुरुषावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम झाले पाहिजे.महिलांचे सक्षमीकरण हे काळाची गरज बनलेली आहे. जर घरातील महिला ही सक्षम असेल तर सर्व कुटुंब सक्षम बनते.महिलांच्या संरक्षणासाठी शासनाने काही कायदे बनवलेले आहेत या कायद्यांची माहिती महिलांना असणे गरजेचे आहे.
बदलत्या काळानुसार महिलांनी जुन्या रुढी व त्यांच्या विचारांनाही बदलले पाहिजे असे सांगितले.
यावेळी मेळाव्यात तालुक्यातील विविध बचत गटातील महिलांनी अनेक प्रकारचे स्टॉल लावले होते. त्यामध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल, तसेच बचत गटातील महिलांनी स्वतः बनवलेल्या गृह उपयोगी वस्तूंचे स्टॉल हे आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. समाज विकास समितीने आयोजित केलेल्या महिला जागृती मेळाव्याचे उद्दिष्ट म्हणजे महिलांना सक्षम करणे, तसेच सर्व डिजिटल ,नवीन उपक्रम व तंत्रज्ञानाद्वारे लिंग समानतेचा संदेश समाजापुढे मांडणे हे होय. समाज विकास समितीच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील विविध बचत गटातील महिलांनी पुरुषांनाही लाजवतील असे आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे. एक यशस्वी महिला म्हणून समाजात ताठ मानेने वावरत आहे. समाज विकास समितीच्या माध्यमातून महिला बचत गटाने टेलरिंग व्यवसाय, कुक्कुटपालन, शेतात फळबाग पिकवणे असे विविध व्यवसाय यशस्वी करून दाखवले आहेत. तसेच महिला जागृती मेळावातून या पुढील वाटचाल व उद्दिष्ट म्हणजे लिंग समानता प्रस्थापनेच्या दृष्टीने बदलत्या काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महिलांनी करणे शक्य आहे हे पटवून देणे.बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास,लिंगसमानताविषयक बाबींचा प्रसार, प्रचार प्रभावीपणे करणे हे असेल. व विविध व्यवसायात महिला प्रगती करून स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडत आहेत.