शिर्डी, दि.१६ (उमाका वृत्तसेवा) – केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्यवस्थापनाचा उत्कृष्ट दर्जा राखल्यामुळे राहाता तालुका पंचायत समिती व अहमदनगर जिल्हा परिषदेला विभाग पातळीवरील यशवंत पंचायत राज अभियान २०२२-२३ करिता प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. संगमनेर पंचायत समितीला तिसऱ्या क्रमाकांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांना पाठविल्या पत्रात पंचायत समिती व जिल्हा परिषदेस गुणांकन जाहीर करण्यात आले आहे. विभागातील सर्वाधिक ३६२.३२ गुणांकन राहाता पंचायत समितीला मिळाले आहे. त्याखालोखाल संगमनेर पंचायत समितीला ३२८.४२ गुणांकन मिळाले आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेला २८५.४६ गुणांकन मिळावे आहे.
ग्रामीण भागाच्या विकासात पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण विकासाच्या सर्व योजना पंचायतराज संस्था मार्फत राबविल्या जातात. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची केलेली अंमलबजावणी तसेच राबविलेले विविध सामाजिक उपक्रम यामुळे विभागस्तरावर राहाता पंचायत समिती व अहमदनगर जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी वेळोवेळी विकास कामांसाठी उपलब्ध करुन दिलेला निधी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने केलेला पाठपुरावा आणि तालुका व जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सर्व गावांना विकास प्रक्रीयेत सामावून घेण्यासाठी केलेली प्रभावी कार्यवाही आणि ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांना केलेले मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळेच प्रशासकीय स्तरावर या दोन्ही कार्यालयांचा दर्जा गुणात्मकदृष्ट्या यशस्वी झाल्याचे या पुरस्कारातून स्पष्ट झाले.
या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि आधिका-यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.