श्रीरामपूर (तालुका प्रतिनिधी)- एकल, विधवा महिलांनी पतीच्या निधनानंतर दु:ख कवटाळून न बसता स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहण्यासाठी स्वावलंबी बनले पाहिजे. महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी आपण सर्व प्रकारची मदत मिळवून देऊ, अशी ग्वाही अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी दिली.
भाजपच्या श्रीरामपूर शहर व तालुका मंडलाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील खा.गोविंदराव सभागृहात आयोजित “रणरागिणी सन्मान सोहळा व सुषमा स्वराज पुरस्कार प्रदान” सोहळ्यात त्या बोलत होत्या. माजी नगरसेवक दांपत्य वैशाली चव्हाण, दीपक चव्हाण तसेच भाजपचे शहर उपाध्यक्ष व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी या सोहळ्याचे संयोजन केले. सुजाता मालपाठक यांना याप्रसंगी सुषमा स्वराज विशेष स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. भाजप महिला मोर्चाच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.याप्रसंगी पतीच्या निधनानंतर एकल (विधवा) महिलांनी ओढावलेल्या परिस्थितीशी झुंज देत, संघर्ष करीत लढा देऊन आपले कुटुंब सावरले, आवरले. स्वतःसह मुला मुलींना स्वतःच्या पायावर उभे केले, अशा श्रीरामपूर शहर व तालुक्यातील झुंजार रणरागिणींना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शालिनीताई विखे पा. पुढे म्हणाल्या, आपण राहाता तालुक्यात सुमारे ४० हजार महिलांचे संघटन उभे केले आहे. त्याद्वारे प्रत्येक महिलेच्या हाताला काम देण्याचा आपला प्रयत्न असतो. शिर्डी येथील साई समाधीवर जी फुले वाहिली जायची त्यांच्यापासून अगरबत्ती बनविण्याचा उद्योग जनसेवा फाऊंडेशनच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही सुरू केला. त्यावेळी तत्कालीन साई संस्थानचे अध्यक्ष स्व.जयंतराव ससाणे यांनीही मदत केली.कुठल्याही महिलेने स्वतः ला कधीही कमी लेखू नये. समाजकारण करताना कोणीही मिळालेल्या पदाची हवा आपल्या डोक्यात जाऊ देऊ नये. वैशाली चव्हाण यांनीही त्यांच्या कार्याच्या माध्यमातून येथे महिलांचे मोठे संघटन उभे केले आहे. आजची महिलांची मोठी उपस्थिती, ही त्याचीच प्रचिती आहे, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मिलिंदकुमार साळवे यांनी केले.आतापर्यंत महिला व समाजाच्या विविध घटकांसाठी अनेक योजना राबवून मदतीचा हात देण्यात आला आहे. यापुढे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दलित, वंचित, उपेक्षितांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही पती-पत्नी कटीबद्ध आहोत, असे दीपक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. माजी नगरसेविका वैशाली चव्हाण यांनी स्वागत केले. या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व महिलांनी केसरी फेटे बांधलेले होते. अवघी नारीशक्ती याठिकाणी एकवटल्याने सभागृह उत्साह व गर्दीने ओसंडून वाहत होते.भूमी चव्हाण हिने अस्सखलित इंग्रजीत केलेल्या मनोगताने मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले.
माजी नगरसेविका वैशाली चव्हाण यांनी आभार मानले. याप्रसंगी जि.प.चे माजी सभापती शरद नवले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारूती बिंगले, माजी नगरसेवक रवी पाटील, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष अनिता शर्मा, तालुकाध्यक्ष रेखा रिंगे,
जयश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्य अहवालाचे प्रकाशन…
महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या कार्य अहवालाचे मा.ना.सौ.शालिनीताई विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीचे समन्वयक मिलिंदकुमार साळवे, मनिषा कोकाटे, बाळासाहेब जपे आदी उपस्थित होते.