शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभेतील महायुतीच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी संगमनेर मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर आश्चर्य व्यक्त करत, त्यामागे संशय असल्याचे सूचित केले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, राज ठाकरे यांनी संगमनेरच्या मतदारांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
राज ठाकरे कधी संगमनेरला आलेच नाहीत सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “राज ठाकरे यांनी संगमनेरचा दौरा करावा आणि येथे येऊन मतदारांची मानसिकता समजून घ्यावी. त्यांनी संगमनेरच्या मतदारांबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. हा मतदारांचा अपमान आहे.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही संगमनेरमध्ये चाळीस-पन्नास हजार मताधिक्य मिळवण्याची अपेक्षा केली होती, पण ती 10 हजारांवरच राहिली. त्यामुळे राज ठाकरेंनी ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. जेव्हा ते संगमनेरला येतील, तेव्हा त्यांना त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं लागेल.”
डॉ. सुजय विखे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारलेल्या प्रश्नाचे राजकीय वातावरण चांगले तापणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.



