दिल्ली –आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र विधानसभेत केलेल्या एका विधानावरून आसाम विधानसभेत चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांना अटक करावी अशी मागणी आसाम विधानसभेत विरोधकांनी लावून धरली आहे.
आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी सदस्यांनी उठून घोषणाबाजी केल्याने कटारिया यांना 15 मिनिटांत आपले भाषण संपवावे लागले. महाराष्ट्रातील आमदारावर काय कारवाई करण्यात आली आहे किंवा करण्यात येणार आहे? असा प्रश्न देखील आसामच्या विरोधी सदस्यांकडून विचारण्यात आला आहे.
आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी भाषण सुरू करताच काँग्रेस आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी बच्चू कडू यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. तर अपक्ष आमदार अखिल गोगोई यांनीही हा मुद्दा राज्यपालांच्या अभिभाषणात समाविष्ट करावा, असे सांगितले. परंतु विरोधी पक्षाच्या आमदारांनी कामकाजात व्यत्यय आणल्याने कटारिया यांना आपले भाषण मध्यंतरी संपवावे लागले.
भटक्या कुत्र्यांबाबत सुरु असलेल्या लक्षवेधीवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, खरे तर भटक्या कुत्र्यावर सोप्पा इलाज आहे. पाळीव कुत्रे रस्त्यांवर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याच्यावर समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला हवी. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यावा. रस्त्यांवर असलेल्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये कुत्र्यांना किंमत आहे.
आठ ते नऊ हजार रुपयांना कुत्रे विकले जातात. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर तिथे कळलं, जसं आपल्याकडं बोकडाचं मांस खाल्लं जातं. तसे, तिकडे कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं, असं बच्चू कडूंनी सांगितलं. त्यामुळे तेथील व्यापाऱ्याला बोलवून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. एक दिवसांत याच्यावर तोडगा निघेल. यासाठी तेथील सरकारशी बोलण्याची गरज आहे. याचा उद्योग होईल आणि ते घेऊन जातील. एकदाचा विषय संपवून टाका, असं बच्चू कडूंनी म्हटलं.
दरम्यान, यावर कडू यांनी स्पष्टीकरणदेखील दिलं आहे. कडू म्हणाले की, “मला आसाम नव्हे तर नागालँडचं नाव घ्यायचं होतं. माझ्या वक्तव्यामुळे आसाममधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो.”