श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा) :- नगरपरिषदे मार्फत राबविण्यात येत असलेली अतिक्रमण हटाव मोहीम ही नगरपरिषदेच्या कर्तव्याचा भाग असून नगर परिषदेच्या डीपी मधील आराखड्यानुसार या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहे.ती सर्व मोकळी करण्याचे काम सध्या सुरू आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणे झालेली असल्याने ती काढताना मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे सकृत दर्शनी दिसत आहे.परंतु याबाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन होणे आवश्यक होते.
शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर सुद्धा मोठी अतिक्रमणे आहेत.त्यामुळे सातत्याने शहरवासीयांना खराब पाणी पिण्यास मिळत असल्याच्या तक्रारी आहेत.त्याचबरोबर गटारी साफ होत नसल्यामुळे आरोग्य सेवेचाही प्रश्न निर्माण झालेला आहे.त्यासाठी शहरातील सर्व मुख्य जलवाहिन्या व गटारीवरील अतिक्रमणे सुद्धा काढली जाणार आहेत.याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे आणि स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावी असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले.
सध्या शहरामध्ये अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असून याबाबत नागरिकांमध्ये मोठे गैरसमज झालेले आहेत.त्या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि शहरांमधील अतिक्रमणे काढण्यासाठी रितसर नोटीसा देऊन मुदत दिली जात आहे तसेच न्यायालयात सुद्धा कॅव्हेट दाखल करण्यात आलेले आहे.काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने मनाई हुकूम न देता फक्त अतिक्रमणे काढून घेण्यासाठी काही मुदत दिली आहे.त्यानुसार पालिका सुद्धा सहकार्य करीत आहे.यापुढे गटारी आणि जलवाहिन्या तसेच रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाई तर होईलच,परंतु सदर अतिक्रमणे काढून घेण्याचा खर्च देखील संबंधितांना करावा लागेल.तेव्हा नागरिकांनी आपले नुकसान टाळण्यासाठी झालेली अतिक्रमणे काढून घ्यावी व नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
श्रीरामपूर शहरासाठी 178 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली असून तिचे कामही सुरू झाले आहे शहरांमध्ये 134 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे त्यासाठी ज्या जुन्या जलवाहिन्या आहेत त्या अतिक्रमणाखाली दाबल्या गेल्या आहेत त्या सर्व जलवाहिन्या मोकळ्या करून पाणीपुरवठा पाईपलाईन सुरळीत करण्यात येणार आहे.भविष्यकाळात पाण्याचा अपवाद टाळण्यासाठी श्रीरामपुरात मीटर पद्धतीने पाणी देण्याची योजना आम्ही तयार केली असून त्यासाठी 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्यानंतर सुरुवातीचे तीन दिवस सर्व मुख्य रस्त्यांवरची अतिक्रमणे काढून घेण्यात आली.त्यानंतर नागरिकांनी स्वतःहून सहकार्य करण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांना आपली अतिक्रमणे सुरक्षित काढून घेण्यासाठी व नुकसान टाळण्यासाठी मुदत देण्याचा निर्णय सुद्धा पालिकेने घेतला असून त्याप्रमाणे नगरपालिका कुठलीही सक्ती सध्या करीत नाही.९० टक्के अतिक्रमणे काढण्यात आलेली आहेत.शहरात काही ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने रहदारीचा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.रहदारीचे सर्व रस्ते मोकळे करणे हा नगरपालिकेच्या कर्तव्याचा भाग आहे. त्यानुसार हे सर्व कामकाज केले जात आहे. या कामाला नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावे आणि अतिक्रमण मुक्त श्रीरामपूर होण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
अतिक्रमण विभागाची स्वतंत्र यंत्रणा
शहरातील अतिक्रमणे काढताना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याला नगरपालिका प्रशासन जबाबदार नाही का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते मान्य करून भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी अतिक्रमण विभागाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून दिली जाणार आहे त्यामुळे भविष्यात शहरात अतिक्रमणे होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुनर्वसनासाठी प्रस्ताव
अतिक्रमणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले तर नगरपालिका पुनर्वसनाचा प्रस्ताव शासकीय पातळीवर तयार करून देईल.नगरपालिकेला मिळालेल्या 21 एकर जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार हजार घरकुले प्रस्तावित आहेत. अंतिम निर्णय राज्य शासन घेणार आहे असे ही ते म्हणाले.