लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा असून, पद्मविभूषण डॉ.आण्णासाहेब हजारे यांच्याशी प्रतारणा करणा-यांना दिल्लीच्या जनतेने त्यांची जागा दाखविली असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
दिल्ली मध्ये भारतीय जनता पक्षाला २७ वर्षांनंतर मिळालेल्या विजयानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना ना.विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राला दिल्लीच्या जनतेने दिलेले हे समर्थन आहे. या निवडणूकीतील विजयाचे चाणक्य केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या यशस्वी रणनितीला जनतेने साथ दिली. या विजया बद्दल ना.विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करुन, विकास प्रक्रीयेच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार जनतेने केला होता, त्याचे विजयात रुपांतर झाल्याचे त्यांनी सांगितले.
आम आदमी पक्षाच्या भ्रष्ट्राचारी राजवटीला जनता कंटाळली होती. लोकांच्या नावाखाली योजना तयार करुन, त्यातील स्वार्थीपणा हा जनतेनेच मतदानाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला. याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की, जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण डॉ.आण्णासाहेब हजारे यांच्या नावाचा उपयोग करुन, अरविंद केजरीवाल यांनी व्यक्तिगत राजकारणाला महत्व दिले. त्यांच्या विचारांशी केलेल्या प्रतारणेला जनतेनेच त्यांचा पराभव करुन उत्तर दिले असल्याकडे ना.विखे पाटील यांनी लक्ष वेधले.
मागील काही दिवसात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने मतदान यादीतील आकडेवारीवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रीयेची खिल्ली उडवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, आता तरी राहुल गांधी यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. दिल्लीच्या जनतेने कॉग्रेसला सपशेल नाकारले आहे. परदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करणा-यांना जनता थारा देत नाही हे दिल्लीच्या निकालाने कॉंग्रेसला दाखवून दिले असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.