शिर्डी (प्रतिनिधी):- सुपर मॉम आणि सुपर वुमनच्या वातावरणात ग्रामीण भागात सुध्दा आपली एखादी मैत्रीण आहे याची आठवण ठेवा. जिजाऊ, सावित्रीचा वसा आणि वारसा घेवून तुम्हालाच पुढे जायचे आहे असा संदेश भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला.
शिर्डी प्रेस क्लबच्या वतीने महीला दिनाचे औचित्य साधून एका शानदार कौटुंबिक सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा सन्मान चित्रा वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. जिपच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील द्वारकामाई वृद्धाश्रमात झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर भाजपाच्या महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, ज्या कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार मिळाले त्या सुमित्रा कैलास कोते(कर्मयोगिनी पुरस्कार), धनश्रीताई सुजय विखे पाटील (ज्ञानवर्धिनी पुरस्कार), रेणुका विवेक कोल्हे (ज्ञानज्योती पुरस्कार), बी. सुधा श्रीनिवास (सेवाव्रती पुरस्कार), पुनम ज्ञानेश डांगे (ज्ञानव्रती पुरस्कार),जरिना पिरमहमंद मनियार(जीवनज्योती पुरस्कार) यांची उपस्थीती होती.
यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, केवळ ८ मार्च नव्हे तर रोजच महिला दिन आहे. महिला वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम करीत आहे. बचत गटांच्या
चळवळीतून महिला चांगले उत्पादन निर्माण करीत आहे. परंतू आपले काम आता त्या चळवळी पुरते सिमित न ठेवता आता उद्योजिका बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करुन, वाघ यांनी सांगितले की, आज महिला वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम करीत असल्या तरी संसाराकडे दुर्लक्ष होवू देत नाही. परंतू त्यांना पुरूषांच्या बरोबरीने संधी मिळाली पाहीजे. महिलांवर अन्याय होत असेल तर धावून जाण्याची गरज वाघ यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी आपल्या भाषणात
महिलांच्या सन्मानाबद्दल प्रेस क्लबच्या पदाधिकाºयांचे कौतुक करून सांगितले की, महिला या विचारांचा वसा आणि वारसा घेवून कार्यरत आहेत. राजमाता जिजाऊंनी शिवबांना स्वराज्य स्थापनेचा संस्कार दिल्याने हे स्वराज्य स्थापन झाले म्हणूनच आज सर्व महिला महिला दिन साजरा करु शकत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रोवला म्हणूनच महिला शिक्षीत झाल्या.
या कार्यक्रमाला सर्वपक्षीय व सामाजिक क्षेत्रातील महिलांनी व पुरूषांनी हजेरी लावली. प्रत्येक महिलेच्या केसात गजरा लावण्यात आला, स्रेहभोजनाचाही महिलांनी आनंदाने आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रमोद आहेर यांनी केले.
कार्यक्रमात नवनाथ दिघे, हरीष दिमोटे, प्रशांत शर्मा, नितीन मिराणे, सुनील दवंगे, नितीन ओझा, मनोज गाडेकर, सागर सावकारे, सागर हिवाळे, रविंद्र महाले, रामभाऊ लोंढे, बाळासाहेब सोनवणे, दिलीप खरात, सचिन बनसोडे, कुणाल जमधडे, किशोर पाटणी, किरण सोनवणे, राजकुमार जाधव, मोमिन खान, कैलास विखे, राजेंद्र बनकर, राहुल कोळगे, पंढरीनाथ पगार, संकेत सदाफळ, साई सुराळे, जावेद शेख, प्रशांत कांबळे, प्रेसफोटोग्राफर परेश कापसे, चंद्रशेखर जगताप, माहिती अधिकारी सुरेश पाटील यांचा सक्रीय सहभाग होता. सुत्रसंचालन सुचेता कुलकर्णी व सुनील दवंगे यांनी केले, पुरस्कार वाचन सागर हिवाळे यांनी केले तर प्रशांत शर्मा यांनी आभार व्यक्त केले.