बीड( जनता आवाज वृत्तसेवा ):- गेल्या दोन महिन्यापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्यातच आता नवीन माहिती समोर आली आहे.बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. हत्येनंतर आरोपी काळ्या स्कॉर्पिओमधून पळून जातानाचे सीसीटीव्ही समोर आले आहे.
त्याच ठिकाणी स्कॉर्पिओ लावून सहा आरोपी पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आरोपीत कृष्णा आंधळेचा देखील समावेश आहे. या व्हिडीओनंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक नव वळण मिळाले आहे.धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरातल्या पारा चौकात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत आरोपी पोहोचतात. याच ठिकाणी गाडी लावून आरोपींनी पलायन केले असून यात सहा आरोपी पळून जाताना दिसत आहे.
विशेष बाब म्हणजे यात कृष्णा आंधळेचा देखील समावेश आहे. परंतु वाशी परिसरात असणाऱ्या साखर कारखान्याच्या दिशेने हे सहा आरोपी जंगलाच्या दिशेने पळून गेले. यावेळी चार किलोमीटरचे अंतर पाई चालले असल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे. या घटनेचा ९ डिसेंबर २०२४ चा संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाला आहे. या नवीन पुराव्यामुळे हे प्रकरण कोणत्या वळणाला जाईल हे सांगता येत नाही.