लोणी दि.७ (प्रतिनिधी):-पद्मश्री विखे पाटलांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून जे रोपटे प्रवरेत लावले, त्याचा खासदार बाळासाहेब विखे पाटलांच्या कार्यकर्तृत्वाने राज्यभरात मोठा वटवृक्ष तयार झाला. या दोघांच्या विचारांची धारणा तयार करून आज प्रत्येक संस्था ही स्वतंत्र वटवृक्षाचे रूप घेतलेले दिसत आहे. याचे सर्व श्रेय विखे पाटील कुटुंबियांना जाते. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी हे सामाजिक कार्य अथक परिश्रम घेऊन अविरतपणे सुरू ठेवले असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
पद्मश्री विखे पाटलांनी सहकारी चळवळीच्या लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला-डॉ. सदानंद मोरे
प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठातर्फे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. यावेळी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, उद्धव महाराज मंडलिक, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, विश्वस्त सौ. सुवर्णाताई विखे पाटील, विश्वस्त मोनिका सावंत,एम.एम पुलाटे, ध्रुव विखे पाटील, कल्याणराव आहेर, कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, पंजाबराव आहेर उपस्थित होते.
सदानंद मोरे म्हणाले की, चीन देशाने मनुष्याचे आरोग्य हेच भांडवल समजून आरोग्या बाबत कार्य करून जपणूक केली. त्याचप्रमाणे विखे कुटुंबियांनी सर्वसामान्यांच्या आरोग्य रक्षणासाठी ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधेमध्ये देशात अग्रेसर ठरणारी प्रगती केली आहे. प्रवरेत सातत्याने नवनिर्मिती केली जाते. याचे कारण येथे अध्यात्मिकतेची आद्य बैठक असल्यामुळे अशा प्रकारचे अद्वितीय कार्य प्रवरेत घडत आहे व यापुढे सुरू राहील असे सदानंद मोरे यांनी सांगितले.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पद्मश्री लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून या वृक्षाचे संगोपन करणे, विस्तार करणे व समाज हितासाठी याचा उपयोग करणे हे काम तसे सोपे नाही. परंतु डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी ते अतिशय सक्षमपणे व समर्थपणे ही जबाबदारी सांभाळीत याचा आणखी मोठा विस्तार केल्याचे समाधान व्यक्त करीत ना. विखे यांनी अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्या.
उध्दव महाराज मंडलिक म्हणाले, विखे परिवाराला अनेक पिढ्यांपासून सेवेचा वारसा आहे. सर्वसामान्य माणूस सक्षम व्हावा यासाठी खासदार विखे पाटील यांनी गल्लीतील कार्य दिल्लीपर्यंत पोहोचविले. डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे आरोग्य क्षेत्रातील कार्य अभूतपूर्व असल्याचे सांगतले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी केले. यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व उपस्थितांनी डॉ. राजेंद्र विखे यांना शुभच्छा देत सत्कार केला.