स्वतःहून अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आज गुरुवार दि. २ मार्च २०२३ ची अंतिम मुदत अर्थात डेडलाईन दिलेली होती. काल गुरुवारी सकाळीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, त्यांच्यासोबत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस बंदोबस्तासह याठिकाणी हजर होते. दुकानदारांनी सकाळपासूनच आपापली दुकाने स्वतः काढून घेण्यासाठी कामाला सुरुवात केली. त्यामुळे सर्व प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत परस्पर सामंजस्याने पार पडली. स्वयंस्फूर्तीने दुकाने काढले जात असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील कुठलेही घाईचे अथवा कडक धोरण घेतले नाही. रस्त्याचा हा संपूर्ण भाग पूर्णतः मोकळा होण्यासाठी १ ते २ दिवसांचा कालावधी लागू शकतो.
कोल्हार भगवतीपूरचा रस्ता झाला मोकळा…अतिक्रमणे काढले ; सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई
कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर येथील श्री भगवती देवीच्या कमानीपासून ते सोनगाव रस्त्यालगत भगवतीनगर पर्यंतची सर्व अतिक्रमित दुकाने आज गुरुवारी काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे रस्त्याचा अनेक वर्षांपासून गुदमरलेला श्वास मोकळा झाला. राहाता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने काढून घेतली. विस्थापित झालेल्या दुकानदारांच्या रोजीरोटीचा प्रश्न गांभीर्याने घेत कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतने पर्यायी ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याचे नियोजित केले असल्याने तोही प्रश्न बऱ्याचअंशी निकाली निघणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हार भगवतीपूरमधील या रस्त्यालगत दुकाने थाटलेली होती. अंदाजे ही सर्व ११० दुकाने या रस्त्यालगत असावीत. यामध्ये बरीचशी दुकाने पत्र्याच्या शेडमध्ये होती. तर काहीजणांनी पक्के बांधकाम केलेले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील हे अतिक्रमण काढण्याचा निर्णय तसा अनेक वर्षापासूनचा आहे. परंतु तो पुढे पुढे टळला जायचा. यावेळी मात्र संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी अगदी पक्के मनावर घेऊन अतिक्रमण काढले. दुकाने काढल्यानंतर आता रस्ता रुंदीकरण केले जाणार आहे.
४ महिन्यांपासून अतिक्रमण काढण्याच्या या प्रक्रियेने वेग घेतला. या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित दुकानदारांना रीतसर तीन नोटीसा बजावल्या. ध्वनीक्षेपकाद्वारे अनाउन्सिंग करून सूचना दिल्या. तसेच समक्ष भेटूनही सांगण्यात आले.
मध्यंतरीच्या काळात येथील श्री भगवतीदेवीची महिनाभर यात्रा सुरू होती. त्यामुळे या कालावधीत रस्त्याचे काम पुढे ढकलून अतिक्रमण काढण्याची मोहीम तात्पुरती स्थगित करण्याची विनंती कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर ग्रामपंचायतने संबंधित विभागाला केली. त्यानुसार यास सहमती दर्शवीत गुरुवार दि. २ मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली. २ मार्चपर्यंत जे दुकाने काढणार नाहीत, त्यांची दुकाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाडली जाणार आहेत.
पुनर्वसनासाठी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतचा पुढाकार….
रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यामुळे विस्थापित झालेल्या व्यवसायिकांची पर्यायी जागेत व्यवस्था करण्यासाठी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतने पुढाकार घेतला. येत्या २ – ३ महिन्याच्या कालावधीमध्ये येथील मटन मार्केटमध्ये ६० नवीन गाळ्यांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जेवढे शक्य होईल तेवढ्या दुकानदारांचे पुनर्वसन केले जाणार असल्याचे समजते. याबद्दल संबंधित दुकानदारांसोबत अनेकदा बैठकादेखील झालेल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई…
याबद्दल राहाता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता के. बी. गुंजाळ आणि शाखा अभियंता एन. बी. जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, हा संपूर्ण ६५० मीटर लांबीचा रस्ता चौपदरी होणार आहे. रस्त्याची रुंदी १५ मीटर राहणार असून दोन्ही बाजूने साईड गटार करण्यात येणार आहेत. रस्त्याच्या मधोमध दुभाजक असेल. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. यासोबत गावाचा चेहरा मोहरा बदलेल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या शासकीय हद्दीत जे अतिक्रमण केले आहे ते काढले जात आहे. भूमी अभिलेख कार्यालयातून नकाशे घेऊन सर्व दस्तावेज तपासून मोजणी करून ही कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.