श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील सुतगिरणी परिसरामध्ये दोन तरुणांमधील जुन्या भांडणाच्या कारणावरून गोळीबार करण्याची घटना घडली. यामध्ये एक तरुण किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेतील तरुण हे अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून गोळीबार होतो, म्हणजे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अल्पवयीन तरुणाकडे पिस्तूल कोठून आला, याची चौकशी होणे गरजेचे आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यातील फिर्यादीचा भाऊ त्याच्या एफझेड गाडीवर भैरवनाथनगर परिसरातील अंगणवाडी येथे त्याच्या आत्याच्या नवीन घराला पाणी मारण्याकरीता चालला असता, त्याच्या आत्याच्या घरासमोरील दिघी रोडवर त्याचा ओळखीच्या एका अल्पवयीन तरुणाने जुन्या भांडणाचे कारण काढून फिर्यादी व त्याच्या भावाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने, जीवे ठार मारण्याची धमकी देवून वाईट वाईट शिवीगाळ केली. तसेच त्याच्या कंबरेला लावलेली पिस्तूल काढून फिर्यादीवर एक आणि फिर्यादीच्या भावावर एक अशा दोन गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये फिर्यादीचा भाऊ किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.



