करंजी( जनता आवाज वृत्तसेवा) :- आता पुन्हा जोमाने कामाला लागा, तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला आराम करून चालणार नाही. निधीची चिंता करू नका, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. शिवाजीराव कर्डिले यांना दिला.
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले मणक्याच्या त्रासामुळे मागील महिनाभर रुग्णालयात उपचार घेत होते. त्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन आ. कर्डिले यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आ. कर्डिले यांनी काही दिवस सक्तीची विश्रांती घेतल्यानंतर मंगळवारी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावत विधानभवनात दाखल झाले. त्यावेळी कर्डिले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची आवर्जून भेट घेतली व मतदारसंघातील विकास कामाविषयी सविस्तर चर्चा केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आता पुन्हा जोमाने कामाला लागा, तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला आराम करून चालणार नाही. पक्षाला आणि मतदारसंघाला तुमची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी कर्डिले यांना प्रोत्साहित केले.
आ. कर्डिले अधिवेशन आटोपल्यानंतर पुन्हा एकदा पूर्वीसारखेच जोमाने आणि उत्साहाने जनतेच्या सेवेत रुजू होणार आहेत. दोन दिवसापुर्वीच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील आ. कर्डिले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.



