राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी तालुक्यातील वडनेर-ताहाराबाद रस्त्यावर असणाऱ्या गव्हाणे वस्ती परिसरात एका शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.शोभाचंद (बोजी) सिताराम गव्हाणे (वय ५०, रा. वडनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर असे की, राहुरी तालुक्यातील वडनेर-ताहाराबाद रस्त्यावर असणाऱ्या गव्हाणे वस्ती येथील शेतकरी गव्हाणे हे आज सोमवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान मकाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेजारीच दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक गव्हाणे यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांना जागेवर ठार केले. त्यानंतर गव्हाणे हे घरी का आले नाही, म्हणून सकाळी घरातील सदस्य हे त्यांना पाहण्यासाठी गेले असता, त्यांनी तेथे घडलेला प्रकार पाहिल्यानंतर सदरील धक्कादायक घटना उघडकीस आली.
यावेळी घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. बिबट्याच्या हल्ल्याने वडनेर परिसरातील शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीस व वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मयत शोभचंद गव्हाणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा मोठा परिवार आहे. ते वडनेर सोसायटीचे चेअरमन किरण चव्हाण यांचे ते चुलते होते.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
गेल्या अनेक दिवसांपासून वडनेरसह पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर होता. अनेक वेळा ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शनही झालेले होते. शेतकरी बांधवही रात्रीच्या वेळी काम करण्यास घाबरत होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना महिन्याभरापासून पिंजरा लावण्यासाठी नागरिकांनी मागणी केली होती. मात्र याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मंत्र्यांच्या बंगल्यात बिबट्या सोडा : माजी मंत्री तनपुरे
राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याच्या संचार वाढला आहे. खरं तर मंत्र्यांच्या बंगल्यात बिबट्या सोडले पाहिजे. जोपर्यंत बिबट्याबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत मृत गव्हाणे यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा आक्रमक पावित्रा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतला आहे.