कोल्हार (प्रतिनिधी ): शासनाकडून कडून गरोदर महिलांसाठी आवश्यक असलेले धन्य व कडधान्य यांचे अंगणवाडीतुन नियमानुसार वाटप होते. मात्र या आहारास पाय फूट असून तो थेट दुकानात विक्रीसाठी जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गर्भश्रीमंत सुद्धा याचा लाभ घेऊन मिळालेला शिध्याचा उपयोग न करता थेट बाजारात खाजगी व्यवसायिकास विकत असल्याने शासकीय योजनेचा दुरुपयोग होत असून पात्र लाभार्थ्यांची नेमकी व्याख्या ठरविणे आवश्यक बनले आहे.
कोल्हार-भगवतीपुर मध्ये एकूण २७ अंगणवाडी आहेत. येथे गरोगर महिलांची घरोघरी जाऊन अथवा इच्छुकांकडून नोंद होते. प्राथमिक आरोग्य केंद्र सलग्न असलेल्या आशा सेविका घरोघरी जाऊन याची माहिती घेतात. अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे असलेल्या नोंदी प्रमाणे विरष्ठांना माहिती पुरवितात. त्याप्रमाणे नोंदणीकृत गरोदर महिलांना हा आहार देण्यात येतो. यामध्ये चना हरबरा, गहू, साखर, मुगडाळ, मीठ, मिरची, हळद आदी वस्तू देण्यात येते. सदर आहार देताना संबंधित व्यक्तीची सही घेऊन नोंद केली जाते.
नोंदणी प्रमाणे आलेला आहार वाटप केला जातो. ३ ते ६ वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना हा आहार शासनाकडून विनामूल्य दिला जातो. अंगणवाडी सेविका व मदतनीस काही महिन्यापूर्वी लग्न झालेल्या घरी सर्व्हे करतात. नंतर सदर आहार घरोघरी नोंदणी प्रमाणे पोहोच करीत आहेत. यामध्ये सदर ग्राहकांचा फोन नंबर घेऊन ऑनलाईन व रजिस्टर मध्ये नोंद करून दिला जातो. मात्र याचा गैरफायदा अनेक नागरिक घेताना दिसत आहेत.
केवळ नोंदणी करायची अन फुकटचा आहार मिळवायचा. परंतु हाच आहार घेऊन इतर ठिकाणी खाजगी दुकानदार व व्यापाऱ्यांना विकला जात आहे. मात्र धनदांडगे याची विक्री दुकानात करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या एका चांगल्या योजनेतून मिळणाऱ्या आहारास पाय फुटत आहेत. सदर आहारासाठी पात्र लाभार्थ्यांची व्यख्या नेमकी कुठली असा प्रश्न समोर येत आहे.
—————————
आहार नको असेल तर नोंदणी करू नका..!
सदर आहार ज्या गरोदर मातांना गरज नाही त्यांनी अंगणवाडी सेविका सर्व्हे करण्यास आल्यावर सांगणे गरजेचे आहे. मात्र कुठल्याही व्यक्तीकडून सर्व्हे करताना नकार येत नाही. पर्यायाने अंगणवाडी सेविका त्यांना घरी जाऊन आहाराचे वाटप करतात. अन तोच आहार बाजारात विकला जात असल्याने शासनाच्या चांगल्या हेतूतून दिला जाणारा आहार बाजारात विकला जातो.
—————————
पायबंद नक्कीच घालणार..!
के बी नांगरे ( प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी ,राहाता)
आम्ही नोंदणीकृत मागणी प्रमाणे आहार देतो. सर्व्हे व शासकीय मागणी नुसार लाभार्थ्यांना वाटप करतो. गरजूंनाच हा आहार मिळावा ही आमची प्राथमिकता आहे. ज्यांना गरज नाही अशी व्यक्ती सदर आहार विकत असतील तर याच्या मुळाशी जाऊ. याकरिता शोध मोहीम राबवून यावर नक्कीच पायबंद घातला जाईल. तसेच शासकीय कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल.