राहाता दि.२२ (प्रतिनिधी) :-उत्तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणा-या निळवंडे धरण कालव्यांच्या आधुनिकी करणासाठी राज्य सरकारने ५ हजार १७७ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिल्याने कालव्यांच्या कामातील सर्व अडथळे दुर झाले असून, लाभधारक शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे. जे महाविकास आघाडी सरकारला जमले नाही ते भाजप-शिवसेना सरकारने करुन दाखविले अशी प्रतिक्रीया व्यक्त करीत शेतक-यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
या संदर्भात लाभक्षेत्रातील शेतकरी, ज्ञानदेव घोरपडे, सचिन मुरादे, त्रिंबक गायकर, रामप्रसाद मगर, कोंडीराम शेळके, जालिंदर मुरादे, महेश वाघे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर निळवंडे कालव्यांच्या रखडलेल्या कामास गती मिळाली. पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालव्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, युती सरकारमुळे लाभक्षेत्रात आता पाणी पोहोचले असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात यापुर्वी महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना निळवंड्याच्या बाबतीत कोणताही निर्णय होवू शकला नाही. कोव्हीड संकटाचे कारण देत निर्णय प्रक्रीया लांबणीवर टाकण्याचे प्रयत्न जाणीवपुर्वक केले गेले. याचा परिणाम कालव्यांच्या कामावर झाला. महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळेच जिरायती पट्ट्यात पाणी पोहोचण्यास विलंब झाला असल्याचा आरोप या लाभधारक शेतक-यांनी केला आहे.
कालव्यांच्या आधुनिकी करणाच्या कामासाठी पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने मंजुर केल्यामुळे मोठा निधी आता उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निधीच्या माध्यमातून दोन्हीही मुख्य कालवे अस्तरीकरण करण्याची तसेच कालव्यांची वितरण व्यवस्था बंद नलिका वितरण प्रणालीव्दारे करण्याची तरतुद करण्यात आली असून, जलाशयावरील उपसा सिंचन योजना एचआरसीआर गेट याचीही तरतुद या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये करण्यात आल्याने डाव्या मुख्य कालव्याचे काम मार्च २०२३ पर्यंत तर उजव्या मुख्य कालव्याचे काम जून २०२३ पर्यंत पुर्ण होणार असल्याचा दिलासा लाभक्षेत्रातील शेतक-यांना मिळाला आहे