लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):- प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून के.जी ते पी.जी पर्यंत शिक्षण सुविधा निर्माण हा परीसर समृध्द करण्याचे महत्त्वपूर्ण काम विखे पाटील परीवारच्या चार पिढ्यांनी केले असल्याचे गौरवोद्गार नासिक परीक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महिविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व क्रीडा दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात कराळे बोलत होते.याप्रसंगी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे, प्राचार्य डॉ प्रदीप दिघे, कॅम्पस डायरेक्टर डॉ आर ए पवार, माजी विद्यार्थी भास्कर राव खर्डे , उपप्राचार्य डॉ. शांताराम चौधरी,डाॅ. छाया गलांडे, डॉ. अनिल वाबळे, डॉ. आर. एल. सलालकर,डाॅ.ए.आर.कु-हे, क्रिडा अधिकारी डाॅ. उत्तमराव अनाप, विद्यापीठ प्रतिनिधी कु. भक्ती सोमवंशी,कु. आदित्य कदम, यांच्या सह विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा गौरवही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना दत्तात्रय कराळे म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी दिले जाणारे शिक्षण आणि ग्रामीण भागामध्येही ४२ हजार विद्यार्थी हे शिक्षण घेऊ शकतात हा एक नवा आदर्श घडला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून अनेक माजी विद्यार्थी राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रशासकीय व्यवस्थेत सर्वोच्च अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचा निश्चित अभिमान वाटतो.
शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्याने जागतिक पातळीवर प्रवरेचे विद्यार्थी पोहोचले आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून आपली संस्कृती कला जोपासण्याचे आवाहन करतानाच, शिक्षणातून मोठे व्हा पण आपली परंपरा सोडू नका. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना आपले ध्येय निश्चित करा ध्येयपूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते. अपयशाने खचून न जाता पुन्हा यश मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यशस्वी लोकांच्या संपर्कात राहून योग्य गुण घ्या, विद्यार्थ्यानी सोशल मीडियाचा वापर जपून करा प्रवरेचे शिक्षण हे यशस्वी व्यक्ती घडवण्यासाठीचे आहे. भारताची संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे ती संस्कृती जपण्याचे काम विद्यार्थ्यांनी करण्याचे मौलिक मार्गदर्शन कराळे यांनी आपल्या भाषणात केले.
यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांनी प्रवरा शैक्षणिक संस्थेमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देत असतानाच यश आणि अपयश यातून योग्य तो संदेश घेऊन पुढे जा असे आवाहन केले.
प्रारंभी प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी महाविद्यालयाच्या आणि संस्थे अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देत असतानाच संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या प्रवारा स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत महाविद्यालयाच्या वर्षभरात ३१ विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेबरोबरच पोलिस आणि आर्मी भरती मध्ये यश संपादन केले आहे. आचार्य चाणक्य कौशल्य अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केले आहे. संस्थेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती बरोबरच संस्थेचा विद्यार्थी हा नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा ठरावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून विशेष उपक्रम सुरू असल्याचे सांगितले.
वार्षिक अहवाल वाचन डॉ. आर. एल. सलालकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. शांताराम चौधरी आणि प्रा. हर्षल खर्डे यांनी तर आभार कॅम्पस संचालक डॉ. आर. ए. पवार यांनी मानले.