शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):- बॉलिवूडची ख्यातनाम कोरिओग्रफर आणि दिग्दर्शिका फराह खान साईदर्शनासाठी शिर्डीत आली होती. तिच्याबरोबर प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावही सपत्नीक हजर होता. या बॉलिवूड कलाकारांच्याबरोबर अभिनेत्री हुमा कुरेशीनंही साई मंदिरात येऊन बाबांचं दर्शन घेतलं. बाबांचं बोलवणं आलं की आम्ही इथं येतो, अगदी दीर्घकाळापासून शिर्डीत दर्शनासाठी येत असल्याची आठवण यावेळी फराह खाननं सांगितली.
“साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर एक वेगळाच अनुभव मिळतो. मंदिरात साईबाबांच्या मूर्ती समोर उभे राहिल्यानंतर एक वेगळीच अनुभूती मिळते जी शब्दातही सांगत येणार नाही. अनेक दिवसांपासून सहपत्नीक साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची इच्छा होती. मात्र येणं होत नव्हतं. आज फराह खाननं सांगितलं की साईबाबांचे बोलावणे आले आहे. आणि अचानक आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आलो आहे. साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेवून मनाला समाधान मिळालं असून आगामी येणाऱ्या “भूल चूक माफ” या चित्रपटाच्या यशासाठी ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली,” असंअभिनेता राजकुमार राव साई दर्शनानंतर सांगितलं.
राजकुमार राव सपत्नीक साईचरणी लीन “दरवर्षी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येत असते आणि नेहमी कोणाला ना कोणाला माझा बरोबर घेवून येत असते. यावेळी अभिनेत्री हुमा कुरेशी , अभिनेता राजकुमार रावला सपत्नीक माझ्या बरोबर साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी आज घेवून आले आहे”, असं अभिनेत्री फराह खाननं सांगितले. साईबाबांना मनापासून जे काही मागितलं तर साईबाबा लगेच देतात. त्यामुळं साईबाबांचं धन्यवाद मानण्यासाठी कायम शिर्डीला येत असल्याचंही फराह खाननं साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना सांगितलं.
हुमा कुरेशी साईच्या दरबारात गेल्या चाळीस वर्षांपासून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत आहे. त्यावेळी मुंबईहुन-शिर्डीला गव्हर्मेंटच्या बसने शिर्डीला येवून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत होते. साईबाबांच्या जीवनावर अनेक चित्रपट आले यापुढे येत राहील. साईबाबांच्या एखाद्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच काम करेल. मात्र साईबाबांची एक सामान्य भक्त म्हणून काम करायला मला आवडलं असंही फराह खान म्हणाली.
प्रसिद्ध अभिनेत्री व दिग्दर्शक फराह खान, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि अभिनेता राजकुमार राव व पत्नी पत्रलेखा पॉल यांनी आज शिर्डीत येवून साई मंदिरात जावून साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी फराह खान, हुमा कुरेशी आणि राजकुमार राव यांचा सहपत्नीक साई मूर्ती व शॉल देवून सत्कार केलाय. चित्रपटसृष्टीतील हे दिग्गज कलाकार अचानक शिर्डीत पोहोचल्याने त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.