कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार भगवतीपूर येथील जागृत देवस्थान कोल्हाळेश्वर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. मंदिरात पूजा – अर्चा, ठीकठिकाणी खिचडी आणि दूध वाटप, रात्री गावातून भव्य सवाद्य पालखी मिरवणूक, महाआरती अशा विविध कार्यक्रमांनी महाशिवरात्र महोत्सव हर्षोल्हासात संपन्न झाला.
कोल्हाळेश्वर महादेव मंदिरात प्रातःकाळी शिवलिंगाचे विधिवत पूजन करण्यात आले. कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, त्यांच्या धर्मपत्नी व देवालय ट्रस्टच्या नवनिर्वाचित विश्वस्त सौ. शितल खर्डे तसेच देवालय ट्रस्टचे नवनिर्वाचित विश्वस्त जनार्दन खर्डे व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुनिता खर्डे यांच्याहस्ते महाअभिषेक करण्यात आला.
कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्यावतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना १ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. महाशिवरात्र महोत्सव समितीच्यावतीने ३ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. गौतमनगरमध्ये प्रसन्न लोखंडे आणि मित्र परिवाराने ५ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप केले. देवालय ट्रस्टचे विश्वस्त सुजित राऊत यांनी २०० लिटर दूध वाटप केले. कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांनी कोल्हाळेश्वर महादेव मंदिरात नवीन पालखी अर्पण केली. येथील हनुमान भक्त व रामनवमी उत्सव समितीने महादेव मंदिरासभोवतालच्या परिसरात सेवाभावीवृत्तीने स्वच्छता मोहीम राबवून केरकचरा काढूूून साफसफाई केली.
दरम्यान कोल्हार भगवतीपूर महाशिवरात्र महोत्सव समितीच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवस अगोदर भव्य तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विजेत्यांना रोख स्वरूपाची पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच महाशिवरात्रदिनी सायंकाळी गावातून भव्य सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी होते. पालखी मिरवणूक पुन्हा महादेव मंदिरात आल्यानंतर रात्री महाआरती करण्यात आली.भाविकांना दूध प्रसादाचे वाटप करण्यात आले.