कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेत २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक परीक्षेचा निकाल ग्रॅज्युएशन डे कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.किंडरगार्टन म्हणजेच केजी मधील विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर पदवीदान समारोह स्वरूपात त्यांना वार्षिक परीक्षेचा निकाल पालकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.केजी मधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली कला सादर केली. विद्यालयाचे प्राचार्य श्री सुधीर मोरे यांनी वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेताना विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विद्यालय राबवीत असलेल्या योजनांची माहिती पालकांना अवगत करून दिली. त्याचप्रमाणे पुढील वर्षाचे नियोजन आणि प्रवेशाबाबत माहिती सांगितली.पालक करीत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्व प्राथमिक वर्गापासूनच मन,बुद्धी आणि शरीर यांचा विकास होण्यासाठी विद्यालय सदोदित प्रयत्न करीत असल्याचे नमूद केले.पालकांनी या कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन विद्यालयात राबवीत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक सौ घुले, सौ घोलप, सौ राऊत,श्री अमोल खर्डे श्री कदिर शेख यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा गायकवाड यांनी केले तर आभार सौ.योगिता करवा यांनी मानले.



