कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यात महावितरणचे अधिक्षक अभियंत्याचे दोन स्वतंत्र सर्कल ऑफिसची मागणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी हा प्रश्न सोडविण्याची कार्यवाही सूचना संबंधित विभागाला केली आहे.
अहिल्यानगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय व्यापक आहे. १७ हजार चौ. कि. मी. क्षेत्रफळ असून १४ तालुक्यात सुमारे ११ लाख १४ हजार वीज ग्राहकांची संख्या आहे. शेती, गृह, व्यावसायिक, औद्योगिक वापराचे ग्राहक यात असून अधीक्षक अभियंत्याचे सर्कल ऑफिस हे सध्या एकच असून त्यामुळे शेवटच्या तालुक्यातील नागरिकाला आपली समस्या सोडवून घेण्यासाठी थेट १२५- १५० किमी पर्यंत अंतर पार करावे लागते हे दुर्देवी आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण असे दोन स्वतंत्र कार्यालय निर्माण झाल्यास मोठा प्रश्न सुटेल, अशी मागणी युवानेते विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला असून यावर कार्यवाही करण्याची सूचना संबंधित विभागाला केली आहे.
महावितरण विभागाने देखील सकारात्मक पावले तातडीने उचलत सदर प्रश्न समजावून घेत त्यावर उचित कार्यवाही सुरू केली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अंतरावर प्रवास करून काही कामे पूर्ण करणे जिकिरीचे होत असल्याने हा प्रश्न जिव्हाळ्याचा बनला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी सामान्य जनतेला होणारा त्रास कमी करून शासनाने दिलेल्या सोयी सुविधा अधिक तत्पर कशा देणे शक्य होईल, यावर अनेक ठोस निर्णय घेतले आहेत. या प्रश्नात देखील त्यांनी लक्ष घातल्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटून नागरिकांना दिलासा मिळेल.
– विवेक कोल्हे, युवानेते