जनता आवाज
लोणी दि.२६( प्रतिनिधी):-
देशाने लोकशाही प्रक्रियेने केलेली वाटचाल ही विकासाची प्रक्रिया पुढे घेवून जाण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरत आहे. लोकशाही प्रक्रियेने नियुक्त झालेल्या सरकारमुळेच पंचायतराज व्यवस्थेचा स्वीकार आपण करू शकलो.या पंचायतराज व्यवस्थेतून ग्रामीण भागाच्या विकासाला मिळालेली दिशा ही ग्रामीणः महाराष्ट्राला पुढे घेवून जाण्यासाठी उपयुक्त ठरल्यानेच या विकासाचा सकारात्मक परिणाम मानवी जीवनातही अमूलाग्र बदल घडविण्यास कारणीभूत ठरत आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, लोणीच्या शैक्षणिक संकुलाच्यावतीने आयोजित प्रजासत्ताक कार्यक्रमात सौ. शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेचे संचालक भाऊसाहेब ज-हाड, गणपतराव शिंदे, दिलीप इंगळे, ट्रक सोसायटीचे चेअरमन नंदुशेठ राठी, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, कृषि संचालिका, शुभांगी साळोखे, अतांत्रिक विभागाचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, शिक्षण समन्वयक प्रा. नंदकुमार दळे आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ.विखे पाटील म्हणाल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे आणि देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे स्वातंत्र्य सेनानी, वीर मरण आलेल्या जवानांना अभिवादन करत असतांना त्यांचे विचार पुढे ठेऊन काम सुरु आहे.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने लोकशाही पध्दतीने वाटचाल केली. यासाठी देशातील प्रत्येक माणसाला मुलभुत हक्क आणि अधिकार मिळाले. यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा आपण स्वीकार केला. सहकार, शिक्षण, उद्योग या क्षेत्रात होत असलेल्या अमुलाग्र बदलांचे परिणाम आपण पाहत आहोत. या सर्व क्षेत्रामध्ये होत असलेले बदल भविष्यात भारताला विश्वगुरु बनविण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरणार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करुन जगाच्या पातळीवर आज आपला देश सर्व क्षेत्रांचे नेतृत्व करण्यास सिध्द झाला आहे. या विकासात्मक वाटचालीत देशातील प्रत्येक नागरीकाचे योगदान हे महत्वपूर्ण आहेच, परंतू या बरोबरच लोकशाही प्रक्रीयेचे मुलमंत्र जपण्याची जबाबदारीही आपल्या सर्वांची आहे असेही सांगितले.
या वेळी देशभक्ती, लोककला, आझादी का अमृत महोत्सव या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम विविध शाळांनी सादर करत देशभक्तीची देशाची अखंडता, पर्यावरण संवर्धन आणि महापुरुषांच्या कार्याची ओळख करून दिली. संस्थेतील पद्यश्री विखे पाटील महाविद्यालय, सैनिकी स्कुल, प्रवरा कन्या विद्यामंदीर, प्रवरा हायस्कुल, यशवंतराव चव्हाण विद्यालय, होमसायन्स आणि संगणक महाविद्यालय, प्रवरा पब्लीक स्कुल, पद्मश्री विखे पाटील कारखाना, प्रवरा मेडीकल ट्रस्ट, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था अशा १६ पथकांनी संचलन करून मानवंदना दिली. संस्थेअंतर्गत विविध क्षेत्रात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव ही यानिमित्ताने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी आणि डॉ. वैशाली मुरादे यांनी तर आभार डॉ. आर. जी. रसाळ यांनी मानले.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील लिटील बर्डस स्कुल, पद्मश्री विखेपाटील मुकबधीर आणि अंध विद्यालय, प्रवरा कन्या विद्यामंदीर, पद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कूल यांनी आझादी का अमृत महोत्सव, राष्ट्रीय एकात्मता, विविध महापुरुषाचे कार्य यावर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.