पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- रांधे येथील शेतकरी सुरेश पंढरीनाथ आवारी हे शेतातील पिकांना पाणी भरण्यासाठी सुरू केलेला वीजपंप बंद करण्यासाठी पहाटे पाच वाजता गेले असता , दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेऊन शेतकरी आवारी यांचा पाय जबड्यात पकडून त्यांना जबर जखमी केले , पण जवळ असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पहाटच्या अचानक सुरू झालेल्या काकड आरतीच्या ध्वनीमुळे बिबट्याने धूम ठोकली .
शेतकरी सुरेश आवारी हे नेहमी प्रमाणे पाटाला पाणी आल्यामुळे पहाटे ५ वाजता आपल्या मळ्यातील विद्युत पंप सुरू केलेला पंप बंद करण्यास गेले असता , त्यांच्या दुचाकीवर बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्यांना जबर जखमी केले. सदर घटना रांधेच्या श्रीहरीवाडी येथे घडली. बिबट्याने चालू दुचाकीवर अचानक झडप मारली त्यांना खाली पाडले.त्यांचा पाय धरून त्यांना पाटामध्ये फरपटत नेले.आपल्या हातातील बॅटरीच्या सहाय्याने त्यांनी त्याच्यावर प्रहार केला , तरी देखील बिबट्याने त्यांना जुमाले नाही .परंतु त्याचक्षणी जवळील रांधेच्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान येथे दररोज पहाटे ५ वाजता भजन संगीत व काकड आरती चालू होते , त्याप्रमाणे आजही हे भजन संगीत अचानक चालू झाले, त्या आवाजाने बिबट्या घाबरला आणि त्याने आपल्या जबड्यात असलेला सुरेश आवारी याचा पाय सोडला आणि धूम ठोकली
लगेचच सुरेश आवारी यांनी आपल्या पत्नी मनिषा आवारी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला. त्यांनी देखील तत्परतेने बाजूला असलेला दिर नवनाथ आवारी , श्री स्वामी समर्थ देवस्थानचे संस्थापक अनिल आवारी , संदीप गहाणडूले यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगाधान पाहून अनेक ग्रामस्थ जमा झाले.
शेतकरी सुरेश आवारी यांना वेदना असह्य झाल्यामुळे देवस्थानचे अनिल आवारी यांनी तत्काळ वनरक्षक श्रीहरी आठरे आणि वनरक्षक उमेश खराडे यांना संपर्क केला.त्यानंतर लगेचच वनरक्षक उमेश खराडे आणि वनरक्षक श्रीहरी आठरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कशाची वाट न पाहता राहुल आवारी यांच्या खाजगी वाहनातून रुग्णास नगर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे. बिबट्याने केलेल्या जबरी हल्ल्यामुळे मोठा रक्तश्राव झाला . पण जीवावरचा धोका टळला आहे .
रांधे परिसरात बिबट्याचे मोठे वास्तव्य असून या एकाच महिन्यांमध्ये बिबट्याने मनुष्यावर हल्ला करण्याच्या ४ घटना घडल्या असून पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या २० ते २५ घटना झाल्या आहेत. आजच्या घटनेवरून श्री स्वामी समर्थ देवस्थानचे संस्थापक अनिल रामचंद्र आवारी यांनी खंत व्यक्त केली की , आज अळकुटी आणि पंचक्रोशीमध्ये बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.बिबट्या आणि इतर हिंस्त्र प्राणी हल्ला झाल्यावर त्यासाठी उपचार म्हणून लागणारे इंजेक्शन घेण्यासाठी ७० किलो मीटर अंतरावरील नगर ला जावे लागते.
अश्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो. रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. त्यासाठी पारनेर तालुक्यातील आरोग्य खाते हे अधिक सक्षम व परिपूर्ण होणे गरजेचे आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्याने अनेक शेतकऱ्यांनी जीव गमावलेले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या अळकुटी मध्ये किंवा पारनेर येथील शासकीय रुग्णालयात हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यांपासून जखमी झालेल्यां साठी उपचार होणे गरजेचे आहे .जेणेकरून रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल , असे ही अनिल आवारी म्हणाले .
घटनेची माहिती मिळताच भाजपाचे मंडल तालुकाध्यक्ष किसनराव शिंदे , सरपंच संतोष काटे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष भास्कर आवारी,गोरख दत्तू आवारी, साईनाथ झिंजाड , संजय आवारी,दिलीप आवारी, विठ्ठल आवारी, सोनल आवारी,अनिता खोसे, शितल पिंगळे,सुनिता आवारी,शांताबाई आवारी, प्रमिला आवारी , चंद्रकांत शिंदे , महेंद्र शिरोळे , रवि दवे , असिफ मोमीन , गोरख जाधव यांनी भेट दिली .



