शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक कार्याध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. पक्षाच्यावतीने गाव वस्ती संपर्क अभियानाचे आयोजन पक्षाच्यावतीने करण्यात आले असून, या अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते जनतेपर्यंत जावून पोहोचणार आहेत.
या बैठकीला सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ.डॉ.राहुल आहेर, आ.विक्रांत पाटील, आ.मोनीका राजळे, आ.विक्रमसिंह पाचपुते, पक्षाचे महामंत्री विजय चौधरी, रवीजी अनासपुरे माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्यासह अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे प्रभारी उपस्थित होते.
सरकार आणि संघटना यांनी एकत्रित संवाद साधून बुथ स्तरापर्यंत काम करण्याचे आवाहन करुन, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र भाजपमय करायचा असेल तर, त्याची सुरुवात स्वत:पासून करावी लागेल. झोपताना सुध्दा छातीवर लावलेले कमळाचे चिन्ह काढू नका, या माध्यमातूनच वातावरण निर्मिती होवू शकेल. सर्व लोकप्रतिनिधींनी शासकीय कमिट्या, विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नियुक्त्या तातडीने करुन घ्याव्यात. कार्यकर्त्यांनी सुध्दा आता या नियुक्त्यांसाठी आपल्या आमदारांच्या पाठीमागे लागावे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांसाठी गावपातळीवर असलेले सीएससी सेंटरवर जास्त लक्ष केंद्रीत करा. सर्व योजनांची अंमलबजावणी येथूनच होते. त्यामुळे येणा-या काळात पक्ष संघटने बरोबरच योजनांच्या कामावर अधिक भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.