लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-वारकरी संप्रदाय आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे काम हे नेहमीच दिशादर्शक राहिले. राजकीय जीवनात असताना देखील वारकरी संप्रदायाच्या प्रती निष्ठा ठेवून त्यांनी जपलेला अध्यात्मिक वारसा पुढे घेवून जाण्याचे काम विखे पाटील परिवाराकडून सुरु आहे. वारकरी संप्रदायाची संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचे काम किर्तन महोत्सवातून होत असल्याचे प्रतिपादन महंत उध्दव महाराज मंडलिक यांनी केले.
लोणी बुद्रूक ग्रामस्थांच्या वतीने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती निमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि जगद्गुरु संत तुकाराम गाथा पारायणाची सांगता उध्दव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. या सोहळ्यामध्ये लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, भाऊसाहेब विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमात विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील, रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील, यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उध्दव महाराज म्हणाले की, आज ताण-तणाव सर्वत्र वाढत आहेत आणि यासाठी आध्यात्मिक चिंतन हे महत्त्वाचे आहे. विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून अध्यात्मिक क्षेत्राला कायमच प्रोत्साहन दिले जाते. याच माध्यमातून लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही लोणी बुद्रूक ग्रामस्थ आणि विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून पुढे नेली जात असल्याचे सांगून पद्मश्री आणि पद्मभूषण यांचे विचार हे युवकांसाठी आणि सामान्य जनतेसाठी दिशादर्शक आहे.
राजकारणातून समाजकारण आणि या समाजकारणातून जनसेवा हेच त्यांनी केले आहे आणि हीच परंपरा आज जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील हे जपत आहेत. चिंतन केले तर चिंतामुक्त आपण होऊ शकतो असे उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगतानाच आपल्या मनाशी संवाद साधा. आदर्श पिढी घडवण्यासाठी पुढाकार घ्या. दुसऱ्याला आनंद देत राहा देत रहा असेही त्यांनी आपल्या कीर्तन सेवेतून सांगितले.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी विखे पाटील परिवार आणि लोणी ग्रामस्थांच्या माध्यमातून सुरू असलेला हा अध्यात्मिक सोहळा आगळा-वेगळा ठरत असून, यामध्ये ग्रामस्थांचाही सहभाग हा वाढत आहे. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा वारसा पुढे जात आहेत त्यांचे विचार जतन करण्याचं काम सर्वांनी करावं असेही त्यांनी सांगितले.
सप्ताह काळामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली प्रवरा परिवाराबरोबरच लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था विविध शाळा महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर पायरेन्स, लोणी, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आदींसह प्रवरा शैक्षणिक, औद्योगिक, समूहामध्ये लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांची ९३ वी जयंती विविध उपक्रमाने संपन्न झाली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी आज लोणी येथे येवून पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांना स्मृतीस्थळावर अभिवादन केले. याप्रसंगी आ.श्रीजया चव्हाण यांच्यासह कुटूंबिय उपस्थित होते. विखे पाटील यांच्या निवासस्थानी चव्हाण कुटूंबियांनी काही काळ थांबून जुण्या आठवणींना उजाळा दिला.



