श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा): – पालिकेच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असलेला साठवण तलाव नंबर 2 मध्ये पाण्याचा मोठा दबाव निर्माण झाल्याने काल रात्री साडेबारा वाजता हा तलाव फुटला. पहाटेपर्यंतच्या पाच तासांमध्ये सुमारे एक कोटी लिटर पाणी तलावातून बाहेर पडले व सदरचे पाणी शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीत तसेच स्वप्न नगरी वसाहतीत शिरले रस्त्यावर देखील पाणीच पाणी झाले.
शहराच्या 178 कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या साठवण तलावाचे खोलीकरण सध्या सुरू आहे तलावामध्ये चार महिन्यापूर्वी भराव टाकून तलावाचे दोन भाग करण्यात आलेले आहे. प्रवरा कालव्याद्वारे नुकतेच या तलावामध्ये पाणी भरण्यात आले होते काल रात्री साडेबाराच्या सुमारास टाकण्यात आलेला भराव खचल्याने तलावाचे दक्षिण बाजूने उतारावर पाण्याचे लोंढे सुरू झाला व सदर पाणी तलावातून बाहेर पडून शेजारच्या शेतात रस्त्यावर तसेच नागरी वसाहत असलेल्या परिसरातील स्वप्न नगरी या वसाहतीत शिरले .
रात्री उशिरा ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नागरिकांनी नगरपालिकेला याची कल्पना दिली पाणीपुरवठा विभागाचे अभियंता निलेश बकाल यांनी तातडीने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना याबाबत कल्पना देऊन सदरचे पाणी रोखण्यासाठी जेसीबी वगैरे उपलब्ध केला परंतु पाण्याचा दबाव जास्त असल्याने रात्री पाणी रोखण्यात अपयश आले. शेवटी सकाळी युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून सदर पाणी बंद करण्यात आले.दरम्यानच्या काळात सुमारे एक कोटी लिटर पाणी वाया गेले त्यामुळे भविष्यात श्रीरामपूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते .पिण्याचे पाण्याचे रोटेशन आता 25 मे च्या दरम्यान सोडण्यात येणार आहे त्यातही पावसाळा लाभल्यास रोटेशन लांबण्याची शक्यता आहे .
सदर तलावाचे खोलीकरणाचे काम अहोरात्र सुरू असते रात्री दहा वाजेपर्यंत सदर काम चालते व पहाटे पुन्हा सुरू होते मात्र काल काम करणारे लवकर घरी गेले होते तसेच इथे वाचमेन वगैरे नसल्याने सदरचा प्रकार कोणाचे लक्षात आला नाही रात्री उशिरा हा प्रकार समोर आला पण खूप रात्र झाल्याने त्यावेळी काहीच करता आले नाही.रात्री निरोप मिळताच मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,पाणीपुरवठा अभियंता निलेश बकाल व त्यांचे सर्व सहकार्यांनी रात्रीची यंत्रणेची जमवा जमव करून भल्या सकाळी वाहणारे पाणी बंद केले. सदरचे काम करताना संबंधित यंत्रणेने तलावात पाणी भरलेले असल्याने भराव खचला किंवा काय याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची चर्चा शहरात आहे .
शहरामध्ये अनेक ठिकाणी पाईपलाईन मध्ये लिकेज होतात वॉल नादुरुस्त होतात पण त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते व हजारो लिटर पाणी वाया गेल्यानंतर व नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पालिकेत त्याची दखल घेते मात्र पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी याबाबत निष्क्रिय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.काल फुटलेल्या तलावाची व त्या संदर्भात झालेल्या कामाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी श्रीरामपूरकरांनी केली आहे.