लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणा-या सुरत ते चैन्नई हा अंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग देशाच्या दृष्टीने हार्टलाईन ठरणार आहे. या मार्गामुळे अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासात महत्वाचा केंद्रबिंदू ठरेल. शेतक-यांनो जमीनी विकू नका, भविष्यात तुमचा जिल्हा औद्योगिक विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी दिला.
३२६ कोटी रुपये किमतीच्या नांदुर शिंगोटी ते कोल्हार या १६० डी या राष्ट्रीय महामार्गाच्या ४७ कि.मी रस्त्याची सुधारणा, ७५० कोटी रुपये किमतीच्या नगर सबलखेड, आष्टी, चिंचपूर ५० कि.मी चा रस्ता, ३९० कोटी रुपयांच्या बेल्हे, अळकूटी, निघोज, शिरुर आणि ११ कोटी रुपये किमतीच्या श्रीगोंदा शहरातील पुलाच्या कामाचा कामांचा शुभारंभ ना.गडकरी यांच्याहस्ते करण्यात आला.
जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार राजाभाऊ वाजे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ.सुजय विखे, आ.मोनीका राजळे, आ.काशिनाथ दाते, आ.विठ्ठलराव लंघे, आ.विक्रमसिंह पाचपुते, आ.अमोल खताळ, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, मुख्य अभियंता संतोष शेलार, प्रशांत फेगडे, अधिक्षक अभियंता दयानंद विभूते आदी याप्रसंगी उपस्थित होते.
ना.गडकरी आपल्या भाषणात म्हणाले की, सुरत ते चैन्नई हा हरित महामार्गावरील १ हजार ६०० कि.मी चा अंतरराष्ट्रीय दर्जाचा अॅक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे आहे. या रस्त्यामुळे सुरत ते चैन्नई हे अंतर ३२० कि.मी ने व नाशिक ते सोलापूर हे अंतर १२० कि.मी ने कमी होईल. रस्त्याच्या भू संपादनासाठी नवीन प्रस्ता केंद्रीय मंत्रीमंडळाकडे सादर करण्यात आला असल्याचे सांगून महिनाभरात या प्रस्तावाला मान्यता मिळेल. रस्त्याच्या बाजूला राज्य सरकारने जमीन संपादन करुन, औद्योगिक क्लस्टर, लॉजेस्टीक पार्क उभे केल्यास एकुण पाच जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याची माहीती त्यांनी आपल्या भाषणात दिली.
धुळे-अहिल्यानगर हा बिओटी तत्वावरील रस्ता असल्याने त्याची अडचण दुर करण्यासाठी या राष्ट्रीय महामार्गाचा डिपीआर तयार करण्यात येत असून, उपलब्ध जागे नुसार हा मार्ग सहा पदरी करण्याचा प्रयत्न आहे. नगर, करमाळा, टेंभूर्णी, सोलापूर या ८० कि.मी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १ हजार १०० कोटी रुपये मंजुर केल्याची माहीती त्यांनी दिली.
अहिल्यानगर-शिर्डी या रस्त्याचे काम घेतलेल्या व ते वेळेत पुर्ण न केलेल्या तीन कंट्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याबरोबरच त्यांची बॅक गॅरंटी जप्त करण्याची सुचना करत या कामासाठी नव्याने निवीदा काढण्यात आली असून, हे काम लवकरच पुर्ण होईल असा विश्वासही मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची लांबी २०२ कि.मी होती. विद्यमान शासनाच्या काळात रस्ते विकासाची८७० कि.मी ची कामे केल्याने ही लांबी आता १ हजार ७१ कि.मी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार २०८ कोटी रुपयांच्या रस्ते विकासाची कामे पुर्ण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, रस्ते विकासाची अशक्य वाटणारी कामे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांतून पुर्ण झाले आहे. रस्ते विकासामुळे या भागातील शेतक-यांनी उत्पादीत केलेल्या मालाची वाहतूक कमी वेळेत होईल. अगामी कुंभमेळा विचारात घेवून, शिर्डी, अहिल्यानगर या रस्त्याच्या कामाबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, तसेच कसारा फाटा ते कोल्हार रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी ना.विखे पाटील यांनी आपल्या भाषणात केली.