राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी तालुक्याची कामधेनू डॉ.तनपुरे कारखाना निवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी मी माझा उमेदवारी अर्जही मागे घ्यायला तयार आहे, तसेच कारखाना हितासाठी व निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अन्य पॅनलचे प्रमुख पदाधिकारी व उमेदवारांनी १४ मे रोजी सकाळी कारखाना कार्यस्थळावर एकत्रित या असे आवाहन माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
यावेळी बोलताना कदम म्हणाले की, तनपुरे साखर कारखाना सभासद व कामगारांच्या हितासाठी सुरू होणे आवश्यक आहे. आजमितीला कारखान्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज आहे. जिल्ह्यातील इतर साखर कारखाने बिनविरोध होत असताना आपला कारखाना का बिनविरोध होत नाही हा प्रश्न आहे. तनपुरे कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार असल्याचे कदम यांनी म्हंटले आहे. तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी ज्या पॅनल प्रमुख पदाधिकारी व उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी १४ मे रोजी सकाळी १० वा. कारखाना कार्यस्थळावरील क्लब हाउस प्रांगणात एकत्रित या आपण चर्चा करू असे आवाहन सत्यजित कदम यांनी केले आहे.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, संतोष चव्हाण, अमोल कदम, सचिन शेटे, सतीश वने आदी उपस्थित होते.



