राहुरी फॅक्टरी( जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी फॅक्टरी ते चिंचविहिरे दरम्यान परिसरात काल शुक्रवारी रात्री जुन्या वादाच्या रागातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडल्याचे समजले असून यामध्ये एका तरुणाच्या पोटात धारदार शस्त्राने वार केल्याचे कळते.
राहुरी फॅक्टरी परिसरात नेहमीच अवैध व्यवसायाच्या कारणांतून व एकमेकांतील खुनसी पणातून नेहमी हाणामाऱ्या होत असता.काल रात्रीच्या दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामाऱ्या होऊन चिंचोली फाटा येथील लोंढे नामक तरुणाच्या पोटात धारदार शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते.
याबाबत राहुरी पोलिसांशी संपर्क साधला असता राहुरी पोलीस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्याची नोंद नव्हती. मात्र या प्रकरणाची राहुरी फॅक्टरी परिसरात जोरदारपणे चर्चा सुरू आहे.
राहुरी फॅक्टरी येथे नेहमीच किरकोळ कारण, अवैध व्यवसायावरून वादावादी, शिविगाळ, हाणामारी या घटना नित्याच्या बनल्या आहेत. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी लक्ष घालून अवैध व्यवसाय व गुन्हेगारी वृत्तीला आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.