कोळपेवाडी( जनता आवाज वृत्तसेवा):- कोपरगाव मतदार संघातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे चांदेकसारे गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची जागा संपादित करण्यात आली होती. त्यामुळे चांदेकसारे, घारी, डाऊच बु., डाऊच खु., सोनेवाडी आदी गावातील नागरीकांना आरोग्य सेवा देणाऱ्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला पर्यायी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या पर्यायी जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
नागपूर-मुंबईचा लांब पल्ल्याचा प्रवास कमी करून प्रवासी व वाहनधारकांचा प्रवास जलदगतीने व्हावा यासाठी निर्माण करण्यात आलेल्या नागपूर-मुंबई राष्ट्रीय समृद्धी महार्गासाठी कोपरगाव मतदार संघातील अनेक गावातील जमीनी मोठ्या प्रमाणात संपादित करण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये चांदेकसारे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची जागा देखील संपादित करण्यात आली होती. त्यामुळे सदरच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत पाडण्यात येवून एम.एस.आर.डी.सी. पर्यायी जागेत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची नवीन ईमारत बांधून देणार होते. परंतु जागा उपलब्ध न होऊ शकल्यामुळे नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न रखडला होता. त्यामुळे चांदेकसारेच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला पर्यायी जागा मिळावी यासाठी आ. काळेंचा शासनदरबारी पाठपुरावा सुरु होता.
आ. काळेंचे नागरिकांनी मानले आभार
चांदेकसारेच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला पर्यायी जागा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून सर्व सुविधांयुक्त प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न आ. काळे यांच्या पाठपुराव्यातून सुटला आहे. त्याबद्दल चांदेकसारे, घारी, डाऊच बु., डाऊच खु., सोनेवाडी आदी गावातील नागरीकांनी आ. काळे यांचे आभार मानले आहे.